चीननमधील वुहान मार्केटमध्ये होणाऱ्या जिवंत प्राण्यांच्या बाजारपेठेने करोना व्हायरसचा फैलाव करण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याचा दावा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटेनेने मात्र जगभरात अशा बाजारपेठ बंद करण्याची कोणतीही शिफारस किंवा सल्ला आपण दिला नसल्याचं सांगितलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अन्न सुरक्षा आणि प्राणी रोग तज्ञ पीटर बेन यांनी सांगितलं आहे की, जिवंत प्राण्यांची बाजारपेठ जगभरातील अनेक लोकांच्या कमावण्याचं साधन असून प्रशासनाने त्या बंद करण्याऐवजी सुधारणा करण्याबाबत विचार केला पाहिजे.

“अशा परिस्थिती अन्न सुरक्षा कठीण आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळेच अनेकदा बाजारपेठांमध्ये अशा गोष्टी घडल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही,” असं पीटर बेन यांनी सांगितलं आहे. प्राण्यांमधून माणसांपर्यंत आजार पोहोचू नये यासाठी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा दर्जा वाढवण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले आहेत.

चीनमधील वुहान मार्केटमधूनच करोना व्हायरसचा फैलाव झाला आहे का ? किंवा व्हायरसचा फैलाव करण्यात या बाजारपेठेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे का ? याबद्दल अद्याप कोणताही पुरावा हाती नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. “पण कोणत्या प्राण्यामधून करोना व्हायरस माणसापर्यंत पोहोचला याबद्दल तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. इतर एखाद्या प्रजातीमून व्हायरसचा फैलाव झाल्याचं निष्पन्न झाल्यास भविष्यात असे आजार रोखण्याच्या उपाययोजना कऱण्यास मदत मिळेल,” असं ते म्हणाले आहेत.

“नेमक्या कोणत्या प्राण्यामुळे करोनाचा फैलाव झाला आहे याची माहिती मिळवण्यात वेळ लागण्याची शक्यता आहे. ज्यांना सुरुवातीच्या काळात करोनाची लागण झाली त्यांच्या मुलाखती घेऊन आरोग्य तज्ञांना विस्तृत अभ्यास करण्याची गरज आहे. आजारी पडण्याआधी कशा पद्धतीने ते प्राण्यांच्या संपर्कात आले होते हे समजून घ्यावं लागेल,” असं पीटर बेन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान चीनने आजपर्यंत जागतिक आरोग्य संघटना किंवा बाहेरील कोणत्याही तज्ञाला तपासाचा भाग होऊ दिलेलं नाही. “चीनमध्ये अशा पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ उपलब्ध असून आम्हाला अद्याप तरी कोणतीही समस्या जाणवलेली नाही,” असं पीटर बेन यांनी सांगितलं आहे.