भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. गुरुवारी देशभरात एका दिवसातील सर्वाधिक १० हजार रुग्णांची नोंद झाली आहे. जागतिक देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर गेल्याने चिंता वाढली आहे. एकीकडे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना श्री गंगाराम रुग्णालयाचे डॉक्टर एस पी ब्योत्रा यांनी मात्र करोनाचा फैलाव सध्याच्या घडीला कमी होण्याची सध्या कोणतीही चिन्हं नसल्याचं म्हटलं आहे.

“करोनाचा फैलाव सध्याच्या घडीला कमी होण्याची सध्या कोणतीही चिन्हं नाहीत. जुलै महिन्याच्या मध्यात किंवा ऑगस्ट महिन्यात अखेरीस करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच करोनावरील लस पुढील वर्षीच्या तिमाहीपर्यंत सापडेल असं वाटत नाही,” अशी माहिती एस पी ब्योत्रा यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाखांच्या जवळ पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत दोन लाख ९७ हजार ५३५ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख ४७ हजार १९५ जणांनी करोनावर मात केली आहे. करोनावर उपचार घेण्याऱ्या रुग्णांपेक्षा ही संख्या जास्त आहे. सध्या एक लाख ४१ हजार ८४२ जणांनर उपचार सुरू आहेत. तर ८ ४९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १० हजार ९५६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या २४ तासांत ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २४ तासात सर्वाधिक मृत्यू आणि नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.