पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. यामुळे लघु-मध्यम उद्योग, शेतकरी तसंच मजुरांना दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण मोदींनी जाहीर केलेल्या या मोठ्या घोषणेत आनंदी होण्याइतकं काही नाही अशी प्रतिक्रिया छत्तीसगड येथून लखनऊला निघालेल्या स्थलांतरित मजुराने दिली आहे. लक्ष्मी साहू या रोजंदारीवर काम करत असून लॉकडाउनमुळे त्यांचाही संघर्ष सुरु आहे. सायकवरुन त्यांनी आपल्या घराच्या दिशेने प्रवास सुरु केला असून ५०० किमीचा टप्पा गाठायचा आहे. एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लक्ष्मी साहू यांचे पतीही उत्तर प्रदेशात रोजंदारीवर काम करतात. आपल्याला आपण घरी सुरक्षित पोहोचू की नाही याची सर्वात जास्त चिंता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेक मजुरांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याच्या बातम्या कानावर येत असल्याने मनात भीती असल्याचं त्या सांगत आहेत.

“हाताला काम नसताना आनंदी होण्याचं कारण काय ? मी मजूर असून सध्या कोणतंच काम नाही…मी काय खाणार ? माझ्या घरी जाऊन शेतात काम करणं हाच पर्याय सध्या दिसत आहे,” असं लक्ष्मी साहू म्हणतात. लक्ष्मी साहू यांनी आपल्या पती आणि मुलीसोबत मंगळवारी रात्री प्रवास सुरु केला आहे. सध्या त्यांनी ७० किमीचा टप्पा पार केला असून रायबरेलीला पोहोचले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपलं मत नोंदवलं.

लक्ष्मी यांनी आपल्य कुटंबासोबत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मोदींच्या घोषणेवर बोलताना त्यांनी सांगितलं की, “आम्हाला काय फायदा…आम्ही जिथे आहोत तिथे रेशनही मिळत नाही. मी तीन रेशन दुकानांवर गेले. प्रत्येकाने मला आधार कार्ड विचारलं, पण धान्य दिलं नाही. घोषणा करण्यापेक्षा त्यांनी घरी जाण्यासाठी बसची सुविधा केली तर जास्त बरं होईल. त्यानंतर तरी किमान आम्ही सरकारला काळजी आहे असं म्हणू शकलो असतो”.