लॉकडाउनमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी विशेष ट्रेन सोडल्या जात आहेत. अशाच पद्दतीने कामगारांना घेऊन निघालेल्या ट्रेनमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ट्रेनमधून प्रवास करणारे कामगार जेवाणाची पाकिटं स्थानकावर फेकून देत असल्याचं दिसत आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल स्थानकावर हा प्रकार घडला असून व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवर सामान्य नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. द क्विंटने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित कामगारांना घेऊन ही ट्रेन केरळमधील एर्नाकुलम येथून बिहारमधील दानापूर येथे चालली होती. पश्चिम बंगालमधील आसनसोल स्थानकावर ट्रेनला १५ मिनिटं थांबण्यात आलं होतं. स्थानिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन थांबली असताना एक हजार कामगारांना अन्न आणि पाणी देण्यात आलं. मात्र यामधील अनेकांनी अन्नाची तक्रार करत स्थानकावरच जेवणाची पाकिटं फेकून देण्यास सुरुवात केली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत कामगार अन्न योग्य नसल्याची तक्रार करत असून मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत. सोबतच अन्नाला दुर्गंध येत असल्याचंही बोलत असताना ऐकू येत आहे. पूर्व रेल्वेचे पीआरओ एकलव्य चक्रवर्ती यांनी काही डब्यांमधून अन्नाचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी आल्याचं सांगितलं आहे.

“रेल्वेकडूनच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. काही डब्यांमधून अन्नाच्या दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. आरोप नाकारण्याचा प्रश्न नाही. अन्नाचा दर्जा योग्य नव्हता. वेळेची कमतरता असल्याने आम्ही दुसरी सुविधा उपलब्ध करु शकलो नाही. पण आम्ही पुढच्या स्थानकावर धान्य उपलब्ध करुन दिलं,” अशी माहिती एकलव्य चक्रवर्ती यांनी दिली आहे. “हे जाणुनबुजून करण्यात आलं नव्हतं. आणि आम्ही आमची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला,” असंही ते म्हणाले आहेत.