लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त हाल मजुरांचे होत आहेत. देशाची राजधानी दिल्लीतही भीषण परिस्थिती आहे. दिल्लीमधील काश्मीरी गेटजवळ हजारो प्रवासी मजुरांवर यमुनेच्या किनारी झोपण्याची वेळ आली आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, या मजुरांना सडलेली केळी खावी लागत आहेत. दिल्लीमधील निगमबोध घाटाजवळ यमुनेच्या किनारी सडलेल्या केळींचा ढीग पडला असून प्रवासी मजूर यामधून चांगली केळी शोधत पोटाची आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. निगमबोध घाटाजवळच शहरातील मुख्य स्मशानभूमी आहे.

एका मजुराने सांगितलं आहे की, “काय करणार…खाण्यासाठी काही मिळत नसल्याने केळी खात आहोत. मी मूळचा अलीगडचा असून येथेच झोपत आहे. जेवायला काही नाही त्यामुळे हे केळ चालेल”. तर दुसऱ्या एका मजुराने म्हटलं आहे की, “केळ लवकर खराब होत नाही. जर आम्ही चांगलं केळ उचललं तर जास्त वेळ ते लवकर खराब होणार नाही”.

५५ वर्षीय जगदीश कुमार मूळचे बरेलीचे असून जुन्या दिल्लीत मजूरी करतात. लॉकडाउनमुळे सगळं बंद पडलं असून त्यांच्याकडे राहण्यासाठीही जागा नाही. रस्त्यावर झोपलं तर पोलीस मारतात यामुळे ते यमुनेच्या किनारीच येऊन राहत आहेत. जगदीश यांनी सांगितलं आहे की, “दोन दिवसांपासून खायला अन्न मिळालेलं नाही. इथेच मजुरी करायचो आणि आता अडकलो आहे”.

यमुना किनारी जगदीश यांच्याप्रमाणे हजारो मजुरांवर ही परिस्थिती ओढावलेली आहे. लॉकडाउनचे दिवस कधी संपणार याची वाट ते पाहत आहेत. प्रसारमाध्यमांची दखल घेत दिल्ली सरकारने अखेर या मजुरांना शाळांमध्ये शिफ्ट करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. दिल्ली सरकारच्या वतीने विपीन रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, “येथे हजारो मजूर आहेत. त्यांना आम्ही शाळांमध्ये नेत आहोत जिथे शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत”.