केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही पगारकपात करण्यात येणार नसल्याचं सांगत अर्थ मंत्रालयाने चुकीचं वृत्त पसरत असल्याची माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाने कोणत्याही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाणार नसल्याचं सांगितलं आहे. अर्थ मंत्रालयाने ट्विट करत हे वृत्त निराधार असल्याचं सांगितलं आहे.

“केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही. काही प्रसारमाध्यमांनी दिलेलं वृत्त चुकीचं असून पूर्णपणे निराधार आहे,” असं अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

एप्रिल महिन्यातही मंत्रालयाने अशाच पद्धतीचं एक ट्विट करत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २० टक्के कपात केली जाणार असल्याचं वृत्त चुकीचं आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं होतं. “केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये २० टक्के कपात केली जाण्याचा विचार केला जात असल्याचं वृत्त दिलं जात आहे. अशी कोणतीही कपात केली जाणार नाही. कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये कोणतीही कपात करण्याचा विचार नाही,” असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर याआधी सरकारकडून केंद्र सरकार पेन्शन योजनेचे लाभार्थी असणाऱ्या वरिष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच विधवा महिलांसाठी तीन महिन्यांची पेन्शन एकत्र देत असल्याचं जाहीर केल होतं.