Coronavirus Outbreak : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. करोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने करोनापासून बचाव करण्यासाठी भारतासह इतर अनेक देश लॉकडाउन आहेत. अशा स्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणारी दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रूग्णालये, किराणा मालाची दुकाने अशी काही मोजकी आस्थापनेच सुरू आहेत. मोठे-मोठे कारखाने, उद्योगधंदे बंद आहेत. बहुतांश लोक वर्क फ्रॉम होमचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यामुळे कार आणि इतर वाहनांमुळे होणारे प्रदुषणदेखील खूप कमी झाले आहे. अशातच भारतासाठी एक अत्यंत चांगली बातमी आली आहे. भारतातील प्रदूषण हे २० वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर असल्याचे अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या उपग्रहाची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात, उत्तर भारतातील वायू प्रदूषण हे विविध वर्षांतील या कालावधीत प्रदुषणापेक्षा यंदाचे प्रदुषण हे २० वर्षातील नीचांकी पातळीवर असल्याचे नमूद केले आहे. करोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या उपग्रहाने सेन्सर्सच्या सहाय्याने सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात भारतात २० वर्षातील सर्वात कमी एरोसोलची पातळी लॉकडाउननंतर आढळली.

“लॉकडाऊन दरम्यान आम्हाला बर्‍याच ठिकाणी वातावरणातील रचनांमध्ये बदल दिसतील अशी अपेक्षा होतीच. पण इंडो-गँगेटिक प्लेनमध्ये एरोसोलचे मूल्य इतके कमी, ते देखील वर्षाच्या या कालावधीत, कधीही पाहायला मिळाले नव्हते”, अशी माहिती नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटर येथील युनिव्हर्सिटीज स्पेस रिसर्च असोसिएशन (यूएसआरए) चे शास्त्रज्ञ पवन गुप्ता यांनी दिली.

“नासाकडून २०१६ पासून दरवर्षी या कालावधीत म्हणजेच वसंत ऋतूमध्ये असे फोटो येतात. यंदाच्या फोटोंमध्ये भारतात हवायुक्त कण (एअरबोन) पातळीत २० वर्षांतील नीचांकी पातळी दिसली आहे. जर भारत आणि जग पुन्हा नव्या उमेदीने काम आणि प्रवास करण्यास तयार आहेत, तर हे खूपच सकारात्मक आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे साऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने हवा स्वच्छ होऊ शकते, हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवावे,” असा संदेश नासाच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाचे कार्यकारी सहाय्यक सचिव एलिस जी वेल्स यांनी ट्वीटद्वारे दिला.