करोनाची साथ पुढील दोन वर्ष कायम राहणार असल्याचा दावा तज्ञांनी एका अहवालातून केला आहे. जगाच्या लोकसंख्येतील दोन तृतीयांश लोकसंख्या करोनामधून मुक्त होत नाहीत तोपर्यंत करोना व्हायरस नष्ट होणार नाही असंही अहवालात सांगण्यात आलं आहे. अनेक लोकांमध्ये करोनाची लक्षणं दिसत नसून त्यांच्यातून इतरांनाही लागण होत असल्याने नियंत्रण मिळवणं अशक्य आहे असा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. मिनेसोटा विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोग संशोधन आणि धोरण केंद्राने हा अहवाल जारी केला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केला आहे. मात्र आता काही देश पूर्वकाळजी घेत काही उद्योग आणि सार्वजनिक ठिकाणांवरील बंधनं उठवत आहे. मात्र करोनाचे विषाणू इतक्या लवकर नष्ट होणार नाहीत. २०२२ पर्यंत करोनाच्या साथीची लाट येत राहील असं अहवालात सांगण्यात आलं आहे.

अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार, सरकारने ही साथ लवकर जाणार नाही याची नोंद सरकारी अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. तसंच लोकांना किमान पुढील दोन वर्ष या साथीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याची सूचना करणं गरजेचं आहे.

दरम्यान याआधी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी देशामध्ये करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढील दोन वर्ष म्हणजे २०२२ पर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार असल्याचे म्हटले आहे. “करोनावरील लस सापडेपर्यंत किंवा देशामधील अतिदक्षता विभागांची संख्या वाढत नाही तोपर्यंत देशामध्ये ठराविक काळानंतर वारंवार सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा लागेल,” असं या लेखामध्ये संशोधकांनी म्हटलं आहे. आरोग्य व्यवस्थेवर सध्या खूप ताण पडत असून हा ताण कमी करण्यासाठी अमेरिकेला इतर देशांप्रमाणे सोशल डिस्टनसिंगचा अवलंब करावा लागणार आहे असं सांगताना संशोधकांनी दक्षिण कोरिया, सिंगापूरसारख्या देशांचे उदाहरण दिलं आहे. सोशल डिस्टनसिंगच्या माध्यमातूनच करोनासंदर्भातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाइनसंदर्भात योग्य निर्णय घेणे शक्य होणार असल्याचेही संशोधकांनी म्हटलं आहे.