15 July 2020

News Flash

“अपरिमित यातना सोसल्या”, मोदींनी देशवासियांना संबोधून लिहिलेल्या पत्रात स्थलांतरितांचा उल्लेख

सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नरेंद्र मोदींचं देशवासियांना संबोधून पत्र

गावचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणीही मोठं नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत असून आज त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधून पत्र लिहिलं आहे. या पत्रात नरेंद्र मोदींनी गेल्या एक वर्षात भारताने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असून वेगाने विकास करत असल्याचं सांगताना स्थलांतरित मजूर, कामगारांचाही उल्लेख केला आहे. करोनाच्या संकटात या सर्वांना अपरिमित यातना सोसाव्या लागल्या असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. सोबतच मोदींनी यावेळी भारत पुन्हा एकदा अर्थव्यवस्था सुरळीत करुन जगासमोर एक उदाहरण ठेवत ज्याप्रमाणे करोनाशी लढा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं तसंच पुन्हा एकदा करणार असल्याचंही सांगितलं आहे.

“संकटाच्या या काळात कोणालाही त्रास झाला नाही असा दावा करणं चुकीचं ठरेल. श्रमिक मित्र, प्रवासी कामगार बंधू-भगिनी, छोटय़ा-छोटय़ा उद्योगात काम करणारे कारागीर, स्थानकांवर सामान विकणारे, टपरी -हातगाडी लावणारे, दुकानदार , लघू उद्योजक अशा सहकाऱ्यांनी अपरिमित यातना सोसल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत,” असं नरेंद्र मोदी यांनी पत्रात म्हटलं आहे.

यावेळी नरेंद्र मोदींनी आपण ज्या अडचणींना सामोरं जात आहोत त्या मोठ्या संकटात रुपांतरित होऊ नयेत याची काळजी घेणंही महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. लॉकडाउनमुळे हातातील काम गेल्याने हजारोंच्या संख्येने कामगार आपल्या राज्यात परतत आहे. सुरुवातीला कोणतंही साधन नसल्याने कामगार चालत आपल्या घऱी निघाले होते. अनेकांनी हजारो किलोमीटरचा प्रवास चालत पार करुन घर गाठलं. अजूनही अनेक मजूर, कामगार प्रवास करत असून रेल्वेकडून श्रमिक ट्रेन सोडल्या जात आहेत.

नरेंद्र मोदींनी पत्रात सांगितलं आहे की, “देशवासीयांच्या इच्छा- आकांक्षांच्या पूर्ततेसाठी जलदगतीने मार्गक्रमण करत असतानाच करोनाने भारतालाही विळखा घातला. एकीकडे अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि विशाल अर्थव्यवस्था असलेल्या जगातील मोठमोठय़ा महासत्ता आहेत तर दुसरीकडे इतकी प्रचंड लोकसंख्या आणि अनेक आव्हानांनी ग्रासलेला आपला भारत देश आहे. जेव्हा करोनाचा संसर्ग वाढेल तेव्हा भारत पूर्ण जगासाठी संकट ठरू शकतो, अशी भीती काही जणांनी व्यक्त केली होती. परंतु भारताकडे बघण्याचा साऱ्या जगाचा दृष्टिकोन बदलला. टाळ्या-थाळ्या वाजवून आणि दिवे प्रज्वलित करून तसेच सेनेकडून करोना योद्धय़ांचा सन्मान असेल, एक दिवसाची जनता टाळेबंदी असेल किंवा देशव्यापी टाळेबंदी दरम्यान नियमांचे निष्ठेने पालन असेल, या सर्व प्रसंगी भारत हीच आपली खरी शक्ती आहे हे साऱ्यांनी दाखवून दिले”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 8:30 am

Web Title: coronavirus lockdown pm narendra modi letter to nation refer migrants sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनावरुन गुजरात सरकारवर ताशेरे ओढणाऱ्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मोठा फेरफार
2 अमेरिकेने WHO सोबतचे तोडले सर्व संबंध; चीनच्या हातची बाहुली असल्याचा ट्रम्प यांचा आरोप
3 बापरे… ‘तो’ एकावेळी खातो ४० पोळ्या आणि दहा प्लेट भात; क्वारंटाइन केंद्रावर अन्नधान्याचा तुटवडा
Just Now!
X