करोनाशी लढा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमन यांच्याशी चर्चा केली असून अर्थखात्याशी संबंधित इतर महत्त्वाच्या खात्यांशीही चर्चा करणार आहे. लघु तसंच लघु आणि मध्यम उद्योगातील काही मोठ्या अधिकाऱ्यांसोबत नरेंद्र मोदी बैठक घेणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. अर्थ मंत्रालय देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांसमोर एक सविस्तर सादरीकरण करणार असून आपल्या वेगवेगळ्या योजनांचीही माहिती देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी वेगवेगळ्या मंत्रालयांच्या बैठकी घेतल्या आहेत. शुक्रवारी नरेंद्र मोदींनी नागरी उड्डाण, कामगार तसंच ऊर्जा मंत्रालयांसोबत चर्चा केली. अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी देशांतर्गत तसंच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासंबंधी नरेंद्र मोदींनी आधीच वाणिज्य तसंच एमसएमई मंत्रालयांसोबत सविस्तर चर्चा केली आहे. या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांसोबत अर्थमंत्रीही उपस्थित होत्या. छोट्या उद्योगांना पुनर्जिवित करण्यावरही यावेळी मंथन करण्यात आलं.

लॉकडाउनचा सर्वात जास्त फटका अर्थव्यवस्थेतील शेवटच्या घटकाला बसला असून त्यांच्यासाठी १.७ लाख कोटींचं पॅकेज आधीच जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत धान्य, घरगुती गॅस तसंच गरीब महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक मदतीचा समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार गरीब तसंच उद्योगांना दिलासा देणारं पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.