पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत. दुपारी चार वाजता नरेंद्र मोदी बोलणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंबंधी ट्विट केलं आहे. पण यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार आहेत यासंबंधी माहिती दिलेली नाही. केंद्र सरकारने चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्याचा निर्णय़ जाहीर केल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान कार्यालयाकडून हे ट्विट करण्यात आलं. त्यामुळे नरेंद्र मोदी भारताचे सार्वभौमत्व, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयावर भाष्य करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान लॉकडाउनचा पाचवा टप्पा आज संपत असून ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरही नरेंद्र मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे. रविवारी ‘मन की बात’मध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली असल्याचं म्हटलं होतं. भारतात सध्या सध्या करोनाबाधित रुग्णांची संख्या साडे पाच लाखांच्या घऱात आहे.

दुसरीकडे पूर्व लडाखवरुन भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. मंगळवारी दोन्ही देशांच्या लष्कर अधिकाऱ्यांमध्ये सैन्य मागे घेण्यावरुन बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये १५ जून रोजी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचं कौतुक केलं होतं. भारतीय जमिनीवर घुसखोरी करणाऱ्यांना भारतीय जवानांनी धडा शिकवला सांगताना नरेंद्र मोदी यांनी चीनचं नाव घेणं टाळलं होतं. यानंतर काँग्रेसने पंतप्रधानांनी जाहीरपणे चीनचा विरोध करण्याची मागणी केली होती.

केंद्राकडून निर्बंध शिथिल
लॉकडाउनला सहावी मुदतवाढ देण्यात आली असून, ती ३१ जुलपर्यंत कायम राहणार आहे. मात्र, या काळात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून, हा लॉकडाउनच्या परतीच्या प्रवासाचा दुसरा टप्पा असेल. रात्रीची संचारबंदीची वेळ कमी करण्यात आली असून आता ती रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत असेल.

नव्या टप्प्यात आर्थिक व्यवहारांचा विस्तार केला जाईल. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकाच वेळी येऊ शकतील, अशी मोठी दुकाने उघडली जाऊ शकतील. केंद्रीय व राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था १५ जुलैपासून सुरू होणार असून त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी टाळेबंदी शिथिलीकरण-२ साठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. नियंत्रित विभाग वगळता शहराच्या अन्य भागांमध्ये अधिकाधिक आर्थिक व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. देशांतर्गत प्रवासी विमानसेवा व रेल्वेसेवा यापूर्वीच सुरू झाली असून त्याचा अधिक विस्तार केला जाईल.

बंदच राहणार!
– शाळा- महाविद्यालये, शैक्षणिक संस्था ३१ जुपपर्यंत बंद राहतील. ऑनलाइन व दूरस्थ शिक्षणास मुभा.
– आंतरराष्ट्रीय विमानसेवा व मेट्रो.
– चित्रपटगृहे, जिन्मॅशियम, पोहण्याचे तलाव, मनोरंजन पार्क, नाटय़गृहे, बार, सभागृहे, समारंभ दालन व अन्य सार्वजनिक ठिकाणी
– सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व मोठ्या जाहीर कार्यक्रम-समारंभांवर बंदी.