करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेवर स्थगिती आणण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने १८ मार्च रोजी दरवर्षी पार पडणाऱ्या रथयात्रेवर स्थगिती आणली होती. सर्वोच्च न्यायालयात निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या असून निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे.

१८ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ रथयात्रा तसंच त्याच्याशी संबंधित इतर सर्व गोष्टींसाठी परवानगी नाकारली आहे. जर आम्ही रथयात्रेला परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाही असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितलं होतं. ओडिशामधील रथयात्रेचा खूप मोठा इतिहास आहे. इतिहासकार असित मोहंती यांनी सांगितल्यानुसार, इतिहासातील नोंदींनुसार १३ व्या शतकात या रथयात्रेला सुरुवात झाली होती. गेल्या २८४ वर्षात कधीही ही यात्रा रद्द करण्यात आलेली नाही.

यादरम्यान ओडिशा सरकारने जनभावना लक्षात घेता याप्रकरणी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने यात्रेवर स्थगिती आणल्याने अनेक संघटनांचा राज्य सरकारवर दबाव आहे. रथयात्रा सुरु होण्यासाठी अवघा काही तासांचा अवधी शिल्लक आहे. मुहूर्तानुसार, २३ जूनला मंगळवारी रथयात्रेला सुरुवात होणार होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.