लॉकडाउनचा सर्वाधिक फटका मजुरांना बसला असून हातावर पोट असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा मजुरांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. राज्यातील प्रत्येक मजुराच्या खात्यात एक हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहे. राज्यातील १० लाख ४८ हजार ६६६ मजुरांना याचा लाभ मिळणार असून यासाठी राज्य सरकारला १०४ कोटी खर्च करावे लागणार आहेत. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

याआधी स्थलांतरित मजुरांच्या खात्यात ६११ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी लॉकडाउनमध्ये राज्यातील ३५ लाख स्थलांतरितांना त्यांच्या घरी पोहोचवलं असल्याची माहिती दिली आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून राज्यात दिवसाला १२ ते १५ लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत होती असंही त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- धक्कादायक… गाझियाबादमधील सरकारी रुग्णालयातील आठही व्हेंटिलेटर्स बंद

“महसूल विभाग आणि मदत कार्यालयाच्या आयुक्तांनी करोनाच्या संकटात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मला वाटतं हे जगातील सर्वात मोठं मदतकार्य होतं. जवळपास ३५ लाख स्थलांतरित मजुर आणि कामगारांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्यात आलं आहे,” अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

“सर्वात जास्त स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत. स्थलातरितांना घरी आणण्यासाठी १६५० श्रमिक ट्रेन्सची सोय करण्यात आली. तर दुसरीकडे या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी १२ हजार राज्य रस्ते वाहतुकीच्या बसेस आणि इतर खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती”.

आणखी वाचा- योगी आदित्यनाथ यांचे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आल्यानंतर सुरक्षा वाढवली

योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयात स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर झालेल्या सुनावणीचा उल्लेख करत इतक्या मोठ्या प्रमाणात मजूर परतलेल्या आपल्या राज्यावर कोणतंही भाष्य केलं नसून एका अर्थी कौतुकच केलं असल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे इतर राज्यांना सुनावलं असल्याचं सांगत टोला मारण्याचा प्रयत्न केला.