श्रमिक ट्रेनमधून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी निघालेल्या स्थलांतरित मजुरांनी ट्रेन उशिरा धावत असून कोणत्याही सुविधा दिली जात नसल्याची तक्रार केली आहे. संतप्त मजूर रेल्वे ट्रॅकवर उतरले असून जबाबदारी घेण्याची मागणी करत आहेत. प्रवासात शिळं अन्न दिल्याची तक्रारही मजुरांनी केली आहे. पनवेलमधून उत्तर प्रदेशच्या जौनपूरसाठी निघालेली ट्रेन वाराणसी येथे १० तासांपासून अडकली होती. रात्री उशिरा संतप्त मजूर ट्रॅकवर उतरले होते. यावेळी समोरुन ट्रेन येत असतानाही मजूर हटण्यास तयार नव्हते. अखेर रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि त्यांच्या जेवणाची सोय केल्यानंतरच हे मजूर हटले. काही वेळाने ट्रेनचा पुढील प्रवास सुरु झाला. उत्तर प्रदेशातील कानपूर जंक्शन येथे देण्यात आलेलं अन्न खराब होतं अशी माहिती ट्रेनमधील मजुरांनी दिली आहे.

“आम्हाला महाराष्ट्रात अन्न मिळालं, पण उत्तर प्रदेशात काहीच मिळालं नाही. आमची ट्रेन वाराणसीत सात तास थांबली होती. नंतर प्रवास सुरु झाला आणि पुन्हा दोन तासांसाठी थांबली. यानंतरही पुन्हा ट्रेन अडकली होती,” अशी माहिती ट्रेनमधून प्रवास करणारे गोविंद कुमार राजभर यांनी दिली आहे.

आणखी वाचा- स्थलांतरित मजुरांचा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता – नीती आयोग

दरम्यान विशाखापट्टणम येथून बिहारसाठी निघालेली ट्रेन १० तासांपासून दीन दयाल उपाध्याय रेल्वे जंक्शनला थांबलेली असून या ट्रेनमधील मजुरांनीही रेल्वे ट्रॅक अडवून धरला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणा दिल्या. “‘ट्रेन रात्री उशिरा ११ वाजता आली असून आम्ही तेव्हापासून इथेच अडकलो आहोत. आम्हाला गेल्या दोन दिवसांपासून अन्नही मिळालेलं नाही. प्रवासासाठी आमच्याकडून जबरदस्ती १५०० रुपये घेण्यात आले,” अशी तक्रार धीरेन राय या स्थलांतरित मजुराने केली आहे.

शुक्रवारी गुजरातमधून बिहारला जाणाऱ्या मजुरांनी उत्तर प्रदेशातील कानपूर जंक्शन येथे अन्न खराब असल्याचं सांगत फेकून दिलं होतं. अशी अमानवीय वागणूक का दिली जात आहे अशी विचारणाही मजुरांनी यावेळी तेथे उपस्थित पोलिसांना केली. कानपूरमध्ये एका मजुराने बोलताना सांगितलं की, “शौचालयांमध्येही पाणी नाही. पिण्याचं पाणी आम्ही कुठून आणू. जेवण्यासाठी देण्यात आलेली पुरी चार-पाच दिवसांपूर्वीची होती. त्यामुळे आम्ही ते अन्न फेकून दिलं”.

आणखी वाचा- Lockdown: भुकेने व्याकूळ झाल्याने रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचं मांस खाण्याची वेळ, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९३० श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने १२.३३ लाख लोक परतले आहेत. उत्तर प्रदेशात जवळपास १८.२४ लाख मजूर परतले असून १२.३३ लाख लोक श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने परतले आहेत. सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी ११९९ श्रमिक रेल्वेंना परवानगी दिली आहे.