जर राज्य सरकार करोनाची परिस्थिती सांभाळण्यात अयशस्वी ठरतंय असं वाटत असेल तर तुम्हीच प्रयत्न करा आणि स्वत: परिस्थिती हाताळत का नाही ? अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुनावलं आहे, ममता बॅनर्जी यांनी रेल्वे मंत्र्यांवर गंभीर आरोप केले असून स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरुन राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रातून पुढील २४ तासात २८ ट्रेन पोहोचणं अपेक्षित आहे.
“मी अमित शाह यांना सांगितलं आहे की, तुम्ही वारंवार केंद्रीय टीम पश्चिम बंगालमध्ये पाठवत आहात. तुम्ही जे हवं ते करु शकता. पण जर पश्चिम बंगाल सरकार योग्य काम करु शकतं असं तुम्हाला वाटत नसेल तर मग तुम्हीच हे करोना संकट का हाताळत नाही ? मला काहीच समस्या नाही”. ममता बॅनर्जी कोलकातामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनच्या मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी त्यांनी हा पत्रकार परिषद बोलावली होती.
“अमित शाह यांनी जे उत्तर दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानले. त्यांनी निवडून आलेल्या सरकारमध्ये आपण दखल कसं काय देऊ शकतो असं म्हटलं,” अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
करोनावरुन पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध रंगलं आहे. केंद्रीय गृहसचिव आणि बंगालचे मुख्य सचिव यांनीही एकमेकांना पत्र पाठवली असून संताप व्यक्त केला आहे. अमित शाह यांनीदेखील करोनाची परिस्थिती हाताळण्यात असणाऱ्या त्रुटी दाखवणारं पत्र ममता बॅनर्जी यांना लिहिलं होतं. पण ममता बॅनर्जी यांनी पत्राचं उत्तर देण्याआधीच हे पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने ममता बॅनर्जी यांनी टीका केली होती.
“मी हे असं जाहीर करत नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता मला अमित शाह यांना एकच सांगायचं आहे की, काळजी घ्या. तुम्ही लॉकडाउन लावला आहे पण ट्रेन आणि विमानं सुरु आहेत. मग लोकांचं काय ?,” अशी विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
“मला पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घ्या असं सांगायचं आहे. आपल्याकडे आधीच करोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण आहेत. काहीजण राजकारणासाठी फैलाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश सगळीकडे फैलाव होत आहे. अशा परिस्थितीत मी काय करावं ? पंतप्रधानांनी अशा वेळी मध्यस्थी करावी,” अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 4:07 pm