केंद्र सरकारने करोनासारख्या इतक्या कठीण काळात राजकारण करणं थांबवावं अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी ही विनंती केली. नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे असंही स्पष्टपणे सांगितलं.
ममता बॅनर्जी यांनी बैठकीत बोलताना म्हटलं की, “आम्ही एक राज्य म्हणून करोनासोबत लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. केंद्राने अशा कठीण काळात राजकारण करु नये. आम्ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा तसंच इतर मोठ्या राज्यांच्या सीमांनी व्यापलो आहोत. आमच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. सर्व राज्यांना समान महत्त्व दिलं पाहिजे. आपण टीम इंडिया म्हणून काम करण गरजेचं आहे”.
लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. मात्र अद्यापही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. त्यामुळे लॉकडाउन वाढवला जाणार की नियम शिथील करत सेवा सुरु केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आणखी वाचा- मजुरांचं स्थलांतरण हे राज्यांसमोरील मोठं संकट; पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली चिंता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सरकारने आता पुढे वाटचाल करण्याचा विचार करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. सोबतच मोठा दृष्टीकोन असण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे. “करोनाविरोधातील लढाईत आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं असल्याचं जग सांगत आहे. या लढाईत राज्य सरकारांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असून धोका रोखण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावण्याचं काम केलं आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
“आपण लोकांनी जिथे आहेत तिथेच थांबवावं यावर जोर दिला होता. पण आपल्या घरी जाणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आपण आपल्या निर्णयात थोडा बदल केला. मात्र यानंतरही करोना गावांमध्ये पसरु नये याची आपण खात्री करणं गरजेचं आहे. हे आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी स्थलांतरित कामगारांच्या मुद्द्यांवर बोलताना म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसी संवाद साधण्याची ही पाचवी वेळ आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते. अमित शाह यांनी यावेळी आरोग्य सेतू मोबाइल अॅप किती महत्त्वाचं आहे हे सांगताना लोकांना हे अॅप डाउनलोड करण्याचं आवाहन करण्यास मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 5:02 pm