करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये दिल्लीचाही समावेश आहे. दिल्लीतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यातच नायब राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याने त्यात भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची चर्चा होती. पण दिल्ली सरकारने लॉकडाउन वाढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीत लॉकडाउन वाढवला जाणार नसल्याचं सांगितलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तामिळनाडूतही लॉकडाउन वाढवला जाणार अशी चर्चा होती. पण तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी हे चुकीचं वृत्त असल्याचं सांगत माहिती फेटाळली आहे.

सोशल मीडियावर लॉकडाउन १५ जून ते ३१ जुलैपर्यंत वाढवला जाणार असल्याचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली आणि तामिळनाडू सरकारने हे स्पष्टीकरण दिलं आहे. दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील लॉकडाउन वाढवण्यात आलेला नसून गर्दी करु नका असं आवाहन जनतेला केलं आहे.

आणखी वाचा- देशातील ‘ही’ राज्य पुन्हा निर्बंध, लॉकडाउन लागू करण्याच्या विचारात

राज्यात परत लॉकडाऊन लावून दुकाने बंद करण्याच्या बातम्या चुकीच्या- उद्धव ठाकरे
“काही समाजमाध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे. असे गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

“आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीचअंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.