07 July 2020

News Flash

“लॉकडाउन नसता तर आत्तापेक्षा खूप जास्त फटका बसला असता का?”; वाचक म्हणतात…

हजारो वाचकांनी या जनमत चाचणीमध्ये नोंदवला आपला सहभाग

लॉकडाउन

लॉकडाउन नसता तर करोनाचा फटका आत्तापेक्षा खूप जास्त बसला असता असं मत ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या वाचकांनी व्यक्त केलं आहे. फेसबुक तसेच ट्विटरवर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये बहुतांश वाचकांनी लॉकडाउनमुळेच करोनाचा देशाला तुलनेने कमी फटका बसल्याचे मत नोंदवलं आहे. फेसबुकवरील जनमत चाचणीमध्ये दोन हजार ९०० जणांनी तर ट्विटवरील जनमत चाचणीमध्ये एक हजार वाचकांनी आपला प्रतिसाद नोंदवला.

देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून सुरु असणाऱ्या लॉकडाउनचा पाचवा टप्पा १ जूनपासून सुरु झाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जागोजागी अडकलेल्या स्थलांतरितांसाठी रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या चालवण्यास सुरुवात केली आहे. मात्र सरकारने नियोजन न केल्यामुळे अनेक ठिकाणी श्रमिक अडून पडल्याचा आरोप करत विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे केंद्राने वेळीच लॉकडाउनचा निर्णय घेतल्याने भारतामध्ये करोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मागील काही आठवड्यांपासून याच मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. म्हणूनच ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने यासंदर्भात जनमताचा कौल घेतला. यामध्ये ‘लॉकडाउन नसता तर करोनाचा फटका आत्तापेक्षा खूप जास्त बसला असता असं वाटतं का?’, असा प्रश्न फेसबुक तसेच ट्विटवरुन विचारण्यात आला होता.

फेसबुकवरील जनमत चाचणीमध्ये दोन हजार ९०० पैकी ९० टक्के वाचकांनी ‘होय’ असं मत नोंदवलं आहे तर केवळ १० टक्के वाचकांनी ‘नाही’ असं मत नोंदवलं आहे. म्हणजेच दोन हजार ९०० पैकी दोन हजार ६०० जणांनी ‘होय’च्या बाजूने मत नोंदवलं आहे तर केवळ २८५ वाचकांनी ‘नाही’ असं मत नोंदवलं आहे. म्हणजेच लॉकडाउन नसता तर करोनाचा अधिक फटका बसला असता असं मत मांडणाऱ्या वाचकांची संख्या ही खूप जास्त असल्याचे फेसबुकवरील जनमत चाचणीत दिसून येतं.

असाच कल ट्विटरवरील जनमत चाचणीमध्येही दिसून येत आहे. ट्विटवरील एक हजार ९१ वाचकांनी या जनमत चाचणीत सहभाग नोंदवला त्यापैकी ८५.५ टक्के वाचकांनी ‘होय, लॉकडाउन नसता तर करोनाचा फटका आत्तापेक्षा खूप जास्त बसला असता’ असं मत नोंदवलं. तर १४.५ टक्के वाचकांनी ‘नाही’ असं मत नोंदवलं. म्हणजेच एक हजार ९१ पैकी ९३३ वाचकांनी ‘होय’ तर केवळ १५८ वाचकांनी नाही असं मत नोंदवलं आहे.

या जनमत चाचणीवरुन एक प्रकारे ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या वाचकांनी केंद्र सरकारने तातडीने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्याचा पाठिंबा दर्शवल्याचे दिसत आहे. अनेकांनी प्रतिक्रियांमध्येही यासंदर्भातील उल्लेख केला असून सरकारने योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्याने भारताला इतर देशांच्या तुलनेत कमी फटका बसल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 10:34 am

Web Title: coronavirus loksatta poll timely lockdown cause less impact on india says readers scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 ट्रम्प यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी व्हाइट हाऊसजवळ पोलिसांनी झाडल्या रबरी गोळया
2 देशाचं नाव ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करा, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
3 चिंताजनक..! देशातील करोनाबाधितांची संख्या दोन लाखांकडे
Just Now!
X