संपूर्ण देशामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सरकारकडून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक स्थळं, थिएटर, जीम, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आली आहेत. देशात ही स्थिती असताना, दुसऱ्या बाजूला गोव्यात मात्र पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नवविवाहित जोडपी, स्वस्तात फिरण्याची आवड असलेले पर्यटक अजूनही गोव्यामध्ये दाखल होत आहेत. सध्या  हॉटेलमधील गर्दी ओसरली आहे. हवाई प्रवासावर काही प्रमाणात निर्बंध आहेत. त्यामुळे विमान तिकिटांचे दर प्रचंड कमी झाले आहेत. गोव्यात हॉटेलच्या रुमचे घसरलेले दर आणि स्वस्त हवाई प्रवास यामुळे गोवा फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्या कमी झालेली नाही.

आणखी वाचा- बायकोला न सांगताच मैत्रिणीसोबत इटलीला फिरायला गेला आणि झाली करोनाची लागण, त्यानंतर….

गोव्यामध्ये अजून एकही करोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही. हे सुद्धा गोव्यातील पर्यटकाची संख्या कायम असण्यामागचे  एक कारण आहे. गोव्यात हनिमूनसाठी आलेले जोडपी तोंडाला मास्क लावून बाईकवरुन फिरताना दिसत आहेत. “करोना व्हायरसमुळे आमच्या मुलाच्या शाळेला सुट्टी आहे. आमच्या कुटुंबासाठी गोवा फिरण्याची ही उत्तम संधी होती. आम्ही आवश्यक काळजी घेतली आहे. ट्रेनऐवजी मी स्वत: गाडी घेऊन आलो आहे” असे पुण्याहून आलेल्या एका तंत्रज्ञाने सांगितले.