दिवसोंदिवस देशामध्ये वाढत असणाऱ्या करोनाग्रस्तांच्या आकड्यामुळे स्थलांतरित मजुरांसमोरील संकट दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असल्याने अनेक राज्यांमध्ये या मजुरांना प्रवेश करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थलांतरित कामगारांच्या ह्रदयद्रावक परिस्थिची वर्णन करणाऱ्या कहाण्या समोर येत आहेत. यापैकीच एक आहे कहाणी आहे आपल्या आजारी मुलाला बांबू आणि खाटेची कावड करुन खांद्यावरुन घरी घेऊन जाणाऱ्या एका बापाची. एक मजूर बाप आपल्या तरुण मुलाला खाटेची कावड बनवून सहकाऱ्याच्या मदतीने खांद्यावरुन घरी नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

एका पत्रकाराने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या पत्रकाराने हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये चित्रित करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच “व्हिडिओमधील व्यक्ती मध्य प्रदेशमधील राहणारी आहे. या वक्तीने पंजाबपासून चालत ९०० किलोमीटरचे अंतर पार असून तो आपल्या जखमी मुलाला खांद्यावर घेऊन जात आहे,” असंही या पत्रकाराने म्हटलं आहे. तसेच पुढे या पत्रकाराने सरकारी यंत्रणाने पूर्णपणे अपयशी ठरली असून सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना यासाठी जबाबदार धरणे गरजेचे असल्याचे मत या पत्रकाराने व्यक्त केलं आहे.

आयएएस अधिकारी असणाऱ्या देव प्रकाश मीणा यांनाही हा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र त्यानंतर त्यांनी तो डिलीट केला. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी अदम गोंडवी यांच्या दोन ओळी कॅप्शन म्हणून लिहिल्या होत्या. “ढो रहा है आदमी कांधे पे खुद अपनी सलीब, जिंदगी का फलसफा जब बोझ ढोना हो गया,” अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिली होती. १८ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला होता. मात्र नंतर मीणा यांनी हे ट्विट डिलीट केलं.

व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती कोण आहे आणि नक्की हे काय प्रकरण आहे यासंदर्भात ‘वन इंडिया’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही मध्य प्रदेशमधील सिंगरौली गावातील राहिवाशी आहे. या व्यक्तीचे नाव राजकुमार असं असून ते लुधियानामध्ये मजुरीचे काम करतात. ते सहकुटुंब लुधियानामध्येच राहत होते. मात्र लॉकडाउन सुरु झाल्यानंतर ते वारंवार वाढत राहिल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी राजकुमार यांनी स्थानिक प्रशासनाकडे स्वत:च्या राज्यात म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये परत जाण्यासंदर्भात मदत मागितली. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यानंतर राजकुमार आणि त्यांच्याच्या आजुबाजूला राहणाऱ्या त्यांच्या गावातील १८ लोकांनी चालतच मध्य प्रदेशला जाण्याचा निर्णय घेतला.

राजकुमार यांचा १५ वर्षीय मुलगा बृजेश याला मानेला दुखापत झाल्याने एवढ्या लांब चालत प्रवास करणे त्याला शक्य होणार नव्हते. त्यामुळेच राजकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बृजेशला एका खाटेवर झोपवलं आणि दोऱ्यांच्या सहाय्याने ती खाट बांबुला बांधून त्याची कावड तयार केली. त्यानंतर आळीपाळीने ही कावड खांद्यावर घेऊन हे १८ जण चालत मध्य प्रदेशच्या दिशेने निघाले. हे लोकं ९०० किमीचा प्रवास करुन उत्तर प्रदेशमधून कानपूरमध्ये पोहचल्यानंतर कोणीतरी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा व्हिडिओ शूट करुन तो व्हायरल केला. या १८ जणांनी केलेल्या ९०० किमी प्रवासापैकी केवळ ५० किमी प्रवास त्यांनी गाडीने केला असून बाकी प्रवास पायीच केल्याचे वृत्तामध्ये म्हटलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मुलाला अशाप्रकारे खाटेवरुन घेऊन जाताना शुक्रवारी रामादेवी हायवेवर स्थानिक पोलीस चौकीचे अधिकारी रामकुमार गुप्ता यांनी पाहिले. गुप्ता यांनी यासंदर्भात राजकुमार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना रडू आले. रामकुमार यांनी या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि त्यानंतर एका वाहनाची सोय करुन देत त्यांना मध्य प्रदेशमधील आपल्या घरी पाठवून दिले.