पत्नीला न सांगताच मैत्रिणीसोबत इटलीला फिरायला जाणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. इटलीहून परतल्यानंतर तपासणी केली असता त्याला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. करोनाची लागण झाली असल्याने आता पत्नीसमोर आपलं बिंग फुटणार याची चिंता त्याला सतावू लागली आहे. आपल्याला करोनाची लागण झाली याची चिंता नाही तर पत्नीला आपलं गुपित कळू नये अशी प्रार्थना तो सध्या करतोय. पत्नीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेलं असून अद्यापही तिला आपल्या पतीला करोनाची लागण कशी झाली याची कल्पना नाही.

या ३० वर्षीय व्यक्तीने पत्नीला आपण कामानिमित्त युकेला जात असल्याचं सांगितलं होतं. पण आपला पती मैत्रिणीसोबत इटलीला फिरायला चालला आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. अजूनही तिला आपल्या पतीला युकेला गेल्यामुळे करोनाची लागण झाली असंच वाटत आहे.

इटलीहून परतल्यानंतर करोनाची लक्षणं दिसत असल्याने त्याने रुग्णालय गाठलं आणि तपासणी केली. यावेळी त्याने तेथील डॉक्टरांना आपण मैत्रीणीसोबत इटलीला गेलो होतो तेव्हा करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट सांगितलं. मात्र त्याने आपल्या मैत्रिणीचं नाव उघड करण्यास नकार दिला.

चीननंतर इटलीला करोनाचा सर्वात जास्त फटका बसला असून बुधवारी एकाच दिवसात ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात करोनामुळे एका दिवसात इतके बळी गेल्याची जगातील ही पहिली घटना आहे. दुर्दैवाने याआधीही एका दिवसात सर्वात जास्त बळी गेल्याची घटनाही इटलीतच घडली होती. त्यावेळी एका दिवसात ३६८ जणांचा मृत्यू झाला होता.