करोनामुळे देशभरामध्ये भीतीचे वातावरण असतानाच बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करोनाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या २५ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांना रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याने या महिलेचा बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या महिलेला उपचारासाठी गया येथील अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पीटलमध्ये (एएनएमएमसीएच) दाखल करण्यात आलं होतं अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. येथील एका कर्मचाऱ्याने दोन दिवस या महिलेवर बलात्कार केला. रुग्णालयामधून घरी सोडण्यात आल्यानंतर अती रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या सासूने रौशनगंज पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विजय कृष्ण प्रसाद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका टीमची स्थापना केली आहे. तसेच हे प्रकरण गंभीर असून रुग्णालयामधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज तपासून पाहिले जातील आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल असं प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.

करोना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होती महिला

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला २५ मार्च रोजी आपल्या पतीबरोबर लुधियानाहून गयाला आली होती. गया येथे आल्यानंतर २७ मार्च रोजी या महिलेले रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. दोन दिवस या महिलेमध्ये करोनाची लक्षणं दिसल्याने तिला १ एप्रिल रोजी आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. या महिलेची करोना चाचणीही करण्यात आली. करोना चाचणी नकारात्मक आली. त्यानंतर ४ एप्रिल रोजी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र दोन दिवसांनी म्हणजेच ६ मार्च रोजी या महिलेचा मृत्यू झाला.

तिनेच मला याबद्दल सांगितलं

माझ्या सुनेवर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने सतत दोन दिवस बलात्कार करण्यात आला, असा धक्कादायक आरोप या महिलेच्या सासूने केले आहे. आधीच गरोदर असलेल्या या महिलेला त्रास होऊ लागला आणि त्यामुळेच अतिरिक्त रस्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप सासूने केला आहे. ‘माझ्या सूनेनेच मला तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली होती. औषध देण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्याबरोबर दुष्कृत्य केल्याचा आरोप तिने केला होता,’ असं या महिलेच्या सासूचं म्हणणं असल्याचं लाइव्ह हिंदुस्तानने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

…म्हणून तक्रार केली नाही

माझी सून यासंदर्भात तक्रार करण्याचा विचार करत होती त्यावेळी तेथील दुसऱ्या कर्मचाऱ्याने आब्रू वाचवण्याचा सल्ला तिला दिला. त्यामुळेच घाबरुन तिने यासंदर्भात तक्रार केली नाही, असं तिच्या सासूने सांगितले. घरी आल्यानंतर या महिलेने अनेकदा त्या कर्मचाऱ्याने केलेल्या कृत्याबद्दल भाष्य केलं. माझी सून आणि तिच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या मृत्यूसाठी तो कर्मचारी जबाबदार आहे, असा आरोप महिलेच्या सासूने केला आहे. माझ्या सुनेला करोना आयसोलेशन वॉर्डमध्ये हलवण्यात आलं नसतं तर तिच्यासोबत असं झालं नसतं असा दावाही त्यांनी केला आहे.