जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्वच देश करोनाचा सामना करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. करोना व्हायरसच्या सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेमध्ये भारतानं आता इटलीलाही मागे टाकलं आहे. भारतात सध्या ६३ हजार १७० पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहे. करोना व्हायरसशी निगडीत रिअल टाईम डेटा मिळवणाऱ्या ‘वर्ल्डोमिटर्स’ या बेवसाईटच्या डेटावरून ही माहिती समोर आली आहे.

चीनननंतर सर्वाधित करोना व्हायरसचा प्रभाव हा इटलीवर पडला होता. इटलीमध्ये आतापर्यंत करोनामुळे ३२ हजार ३३० जणांना मृत्यू झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या २ लाख २५ हजारांपेक्षाही अधिक आहे. तर भारतात आतापर्यंत १ लाख ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच देशात दररोज ५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या दृष्टीनं पाहिलं तर अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्स या देशांमध्येच भारतापेक्षा सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. अमेरिकेत सध्या ११ लाखांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर रशियात २ लाख २० हजार, ब्राझिलमध्ये १ लाख ५७ हजार आणि फ्रान्समध्ये ९० हजार अ‍ॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती समोर आली आहे.

रिकव्हरी रेट चांगला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारताचा रिकव्हरी रेट हा ४० टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. २५ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी तो ७ टक्के इतका होता. रुग्णालयाची गरज केवळ ७ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना आहे. तसच भारतात करोनामुळे होणारा मृत्यूदरही कमी असल्याचं आरोग्य मंत्रायलानं म्हटलं आहे. भारतात आतापर्यंत जवळपास ३ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत करोनामुळे ९५ हजार जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर युनायटेड किंगडममध्ये ३५ हजार ७०४, इटलीमध्ये ३२ हजार ३२० तर फ्रान्समध्ये २८ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जगभरातील करोनाग्रस्तांच्या संख्येपैकी अर्धी रुग्णसंख्या अमेरिका, रशिया, ब्राझिल, स्पेन आणि युनायटेड किंगडम या पाच देशांमध्ये मिळून आहे.