करोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातला असून अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. देशातील अशीच एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात एकाच कुटुंबातील आई आणि पाच मुलांचा एकामागोमाग एक मृत्यू झाल्याची दुख:द घटना समोर आली आहे. आईला करोनाची लागण झाल्यानंतर चारही मुलांना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. तर एका मुलाला फुफ्फुसचा कॅन्सर झालेला होता. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. करोनामुळे एकाच कुटुंबातील इतक्या जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महिलेला सहा मुलं असून एक मुलगा दिल्लीत राहतो.

महिलेने दिल्लीमधील लग्नात लावली होती हजेरी-
८८ वर्षीय महिला आपल्या नातीच्या लग्नाासठी २९ जून रोजी दिल्लीमध्ये आली होती. पण लग्नानंतर त्या आजारी पडल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर एकामागोमाग एक पाच मुलांचा मृत्यू झाला. कुटुंबातील अन्य दोन सदस्यही करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

४ जुलै रोजी महिलेचा मृत्यू –
महिलेला २९ जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. ४ जुलै रोजी त्यांचं निधन झालं. मृत्यूनंतर चाचणी केली असता त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. हा कुटुंबातील पहिला मृत्यू होता.

१० जुलै रोजी पहिल्या मुलाचा मृत्यू-
महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करण्यात आली. यावेळी ६५ वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गेल्या १० दिवसांपासून त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवत होता. १० जुलै रोजी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

११ जुलै रोजी दुसऱ्या मुलाचा मृत्यू –
११ जुलै रोजी ६७ वर्षीय दुसऱ्या मुलाचा कोविड रुग्णालयात करोनामुळे मृत्यू झाला. ८ जुलै रोजी ते करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांनाही श्वास घेण्यास त्रास होत होता.

१२ जुलै रोजी तिसऱ्या मुलाने घेतला अखेरचा श्वास –
१२ जुलै रोजी तिसऱ्या मुलाचं निधन झालं. ८ जुलै रोजी त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यांना ९ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तीन दिवस उपचार केल्यानंतर त्यांचं निधन झालं. रांचीमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१६ जुलै रोजी पाचव्या मुलाचा मृत्यू –
फुफ्फुसाचा कॅन्सर झालेल्या पाचव्या मुलाचं १६ जुलै रोजी रुग्णालयात निधन झालं. कॅन्सर झाल्याने त्याची प्रकृती बिघडली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. नंतर जमशेदपूरला आणण्यात आलं होतं.

१९ जुलै रोजी पाचव्या मुलाचा मृत्यू –
महिलेच्या ७० वर्षीय चौथ्या मुलालाही करोनाची लागण झाली होती. ८ जुलै रोजी त्याला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती बिघडल्यानंतर १३ जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १९ जुलै रोजी त्यांचं निधन झालं. त्यांनाही श्वास घेताना त्रास जाणवत होता.