News Flash

निर्भया प्रकरण: सध्या करोनाचा कहर, फाशी देण्यासाठी योग्य वेळ नाही; दोषींची नवी शक्कल

निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींना फासावर लटकवण्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे

निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींना फासावर लटकवण्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र फाशी टळावी यासाठी आरोपी अजूनही प्रयत्न करताना दिसत आहेत. चारही आरोपींनी आपली फाशी रद्द व्हावी यासाठी नवी शक्कल लढवली आहे. आरोपींनी दिल्लीमधील पटियाला कोर्टात याचिका दाखल केली असून फाशी रोखण्याची मागणी केली आहे. याचिकेत दोषींनी वेगवेगळे दावे केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी करोनाचा हवाला देत सध्या फाशी देण्यासाठी योग्य वेळ नसल्याचं म्हटलं आहे. नवभारत टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

तीन दोषींची नातेवाईकांनी घेतली अंतिम भेट
निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अक्षय ठाकूर वगळता इतर तीन दोषी पवन, विनय आणि मुकेश यांच्या कुटुंबीयांनी शेवटची भेट घेतली आहे.

फाशीची पूर्ण तयारी –
फाशी देण्यासाठी कारागृहात पूर्ण तयारी करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, दोषी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज सुरु ठेवलं जाऊ शकतं. निर्णय येण्यासाठी रात्र होऊ शकते. पण आता फाशी रद्द होणं अशक्य असल्याचं दिसत आहे. कारण दोषींसमोरील सर्व पर्याय संपले आहेत.

दरम्यान चार दोषींपैकी एकाची दुसरी दया याचिका अद्याप प्रलंबित असल्यामुळे या चौघांच्या फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी करण्यासाठी या चौघांच्या वकिलाने बुधवारी येथील न्यायालयात धाव घेतली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी या याचिकेवर तिहार कारागृहाचे अधिकारी व पोलीस यांना नोटिसा जारी करतानाच, आपण याचिकेची उद्या, गुरुवारी सुनावणी करू असं सांगितलं होतं. दोषी अक्षय सिंह याने मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दुसरी दया याचिका केली. याच दिवशी, पवन गुप्ता या दुसऱ्या दोषीनेही आपला अल्पवयीन असल्याचा दावा नाकारणाऱ्या फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका केली. त्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सकाळी फेटाळून लावली.

मुकेश सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या चौघांना २० मार्चला, शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट यापूर्वीच जारी करण्यात आले आहेत.

मुकेश सिंहच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाचा निकाल राखून
१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खुनाचा गुन्हा घडला, त्या दिवशी आपण राष्ट्रीय राजधानीत नव्हतो हा या गुन्ह्य़ात दोषी मुकेश सिंह याचा दावा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर; या निर्णयाला आव्हान देणाऱ्या त्याच्या याचिकेवरील आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. दोषी मुकेश सिंह आणि दिल्ली सरकार या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. ब्रिजेश सेठी यांनी आदेश राखीव ठेवला.कनिष्ठ न्यायालयाने मुकेशची याचिका फेटाळून लावली होती आणि त्याच्या वकिलांना योग्य ती समज द्यावी, असे बार कौन्सिल ऑफ इंडियाला सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 11:30 am

Web Title: coronavirus nirbhaya case convict urge halt hanging sgy 87
Next Stories
1 CoronaVirus : करोना संशयिताची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
2 Coronavirus: घरुन काम करा पण कॅमेऱ्यासमोर बसून, कर्मचाऱ्यांना अजब आदेश
3 Coronavirus: धक्कादायक! संशोधक म्हणतात, ‘हा’ रक्तगट असणाऱ्यांना करोनाचा सर्वाधिक धोका
Just Now!
X