करोना विषाणूमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेल्या दहशतीचे दोन आश्चर्यचकीत करणारे किस्से समोर आले आहे. दिल्लीत एका घराबाहेर रस्त्यावर ५०० रुपयांच्या अनेक नोटा पडल्या होत्या. मात्र, कोणीही या नोटांना हात लावण्याचीही कोणी हिम्मत केली नाही. तसेच दुसऱ्या एका घटनेत इंदूरमध्येही रस्त्यावर पडलेल्या सुमारे ६ हजार रुपयांना कोणीही स्पर्श केला नाही.

दिल्लीतील लॉरेन्स रोड या भागात हा प्रकार घडला आगे. येथे राहणाऱ्या लोकांनी रस्स्त्यावर पडलेल्या या नोटा पाहिल्या पण त्यांना वाटलं की, करोना विषाणूचा फैलाव करण्यासाठी कोणीतरी मुद्दामच हे कारस्थान केलं असावं. घाबरलेल्या स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या नोटा निर्जंतुक करुन एका पाकिटात घालून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

या नोटा रस्त्यावर आल्या कशा या रहस्याबाबत जेव्हा पडदा उठला जेव्हा एका महिलेनं पोलिसांना सांगितलं की, “मी एटीएममधून काढलेल्या नोटा सॅनिटायझरने धुऊन घराच्या बाल्कनीमध्ये सुकवण्यासाठी ठेवल्या होत्या. त्यानंतर हवेमुळं यातील काही नोटा खाली रस्त्याच्या बाजूला पडल्या.” यावर पोलिसांनी प्रतिक्रया देताना म्हटलं, “रस्त्यांवर पडलेल्या नोटां कोणीही उचलल्या नाहीत, असं वाटलं जसं राम राज्यच आलं आहे.”

इंदूरमध्येही रस्त्यावर सापडले हजारो रुपये

इंदूरच्या हिरा नगर भागातही अशीच एक घटना समोर आली. यामध्ये ६,४८० रुपयांची रोकड रस्त्याच्या बाजूला पडली होती. मात्र, या नोटांना कोणीही हात लावला नाही. स्क्रोलच्या वृत्तानुसार, इथल्या स्थानिक लोकांना २०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा रस्त्याच्या बाजूला पडलेल्या दिसल्या. मात्र, करोना विषाणूच्या भीतीमुळे या नोटांना कोणीही हात लावला नाही. स्थानिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या सर्व नोटांचे निर्जंतुकीकरण करुन त्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले.