जगभरातील १५० हून अधिक देशांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. इटली आणि स्पेनमध्ये तर या विषाणूंचा सर्वात प्रथम प्रादुर्भाव झाला त्या चीनपेक्षाही जास्त जिवीतहानी झाली आहे. इटलीमध्ये आठ हजारहून अधिक तर स्पेनमध्ये चार हजारहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. इटली आणि स्पेनमध्ये करोनामुळे वयोवृद्ध व्यक्ती मरण पावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच आधीपासूनच एखादा आजार असणाऱ्या व्यक्तींना करोना झाल्यास अधिक धोका असतो हे या दोन देशांमधील मृत्यूची आकडेवारी पाहिल्यावर दिसून येत आहे. यामध्ये खासकरुन मधूमेह, हृद्यरोग, श्वसनाचे आजार असणाऱ्यांना करोना झाल्यास अधिक धोकादायक ठरु शकतं. असं असतानाही सर्वांवर मात करुन जगण्याची नवीन उमेद देणाऱ्या काही सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. इटलीमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील एक १०१ वर्षाच्या आजोबांनी करोनाला अवघ्या एका आठवड्यामध्ये हरवले आहे. हे आजोबा आता उपचार घेऊन घरीही गेले आहेत.

नक्की वाचा >> Coronavirus: जो मूर्खपणा इटली, जर्मनी, स्पेन व अमेरिकेच्या नागरिकांनी केला तोच भारतीय करतायत

मिळालेल्या माहितीनुसार, मिस्टर पी (बदलेलं नाव) या वृद्ध व्यक्तीचा जन्म १९१९ मध्ये झाला आहे. या व्यक्तीला करोनाची बाधा झाली. या व्यक्तीला रिमिनी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आठवड्याभरापासून या आजोबांवर उपचार सुरु होते. रिमिनीच्या उपमहापौर ग्लोरिया लिसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “१०० वर्षाच्या या आजोबांनी यशस्वीपणे करोनाचा सामना करुन ते सुखरुप बाहेर आले हे आशादायक आहे.” अशा बातम्या खूप उर्जा आणि सकारात्मकता देतात असंही ग्लोरिया म्हणाल्या. “मागील काही आठवड्यांपासून आम्ही केवळ निराशाजनक बातम्या ऐकत होतो. वृद्ध व्यक्तीसाठी हा विषाणू जिवघेणा ठरत आहे. मात्र या आजोबांनी त्या विषाणूला हरवलं. ते जिंकले. ते वाचले,” अशा शब्दात ग्लोरिया यांनी आपला आनंद व्यक्त केला.

नक्की वाचा >> इटलीने करोनाग्रस्त वृद्धांना मरायला सोडून दिलंय का? वाचा खरं काय आहे…

बुधवारी या १०१ वर्षाच्या व्यक्तीला रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले, अशी माहितीही ग्लोरिया यांनी दिली.

फोटोगॅलरी >> करोनाने इटलीत का घेतले इतके बळी?; जाणून घ्या २० महत्वाच्या गोष्टी

इराणमध्येही एक १०३ वर्षाची महिला करोनामुक्त झाल्याचे वृत्त १८ मार्च रोजी समोर आलं होतं. आयआरएनए या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या महिलेला सिमनान शहरातील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर ही महिला पूर्णपणे बरी झाली आणि त्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला होता.