भारताप्रमाणेच अमेरिकन नागरिकन नागरिक देखील करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. अमेरिकेत १०० पेक्षा अधिक लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. करोनाची लागण होऊ नये म्हणून अमेरिकन सरकारने काही विशेष पाऊले उचलली आहेत. तेथील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र यामुळे एका मुलीला आपल्या आजोबांना खिडकीतूनच लग्नाचे आमंत्रण द्यावे लागले आहे.

अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आलं आहे. हे ठिकाण करोनापासून सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकन सरकारने केला आहे. या ठिकाणी त्यांना खाण्यापिण्यापासून मनोरंजनापर्यंत सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र बाहेरच्या कोणत्याच व्यक्तीला त्यांना भेटता येत नाही. दरम्यान एक मुलगी आपल्या आजोबांना भेटण्यासाठी या नर्सिंग होममध्ये आली. मात्र तिला तेथील सुरक्षारक्षकांनी अडवलं. अखेर खूप विनंती केल्यानंतर त्यांनी तिला खिडकीतून आजोबांना भेटण्याची परवानगी दिली. ही काचेची खिडकी ध्वनी प्रतिरोधक असल्यामुळे तिचा आवाज आजोबांपर्यंत पोहोचत नव्हता. अखेर तिने इशारे करुनच आपल्या लग्नाचे आमंत्रण आजोबांना दिले.

आपल्या नातीला पाहून आजोबा खूपच भाऊक झाले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहात होते. परंतु त्याचबरोबर आपल्या नातीपासून दूर असल्याचे दु:खही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हा प्रसंग तेथील एका परिचारिकेने आपल्या कॅमेरात कैद केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होत आहे.