,
News Flash

‘करोना हेल्पलाइन’पेक्षा मद्यासाठी गुगलवर झुंबड

दक्षिण भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये दारुसंदर्भात सर्वाधिक सर्च

(Express photo by Partha Paul/File)

देशामध्ये ४ मे पासून म्हणजेच सोमवारपासून देशामध्ये अनेक ठिकाणी दारु विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्या दिवसापासूनच ऑनलाइन दारु मिळते का हे पाहणाऱ्या भारतीयांची संख्याही दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. ‘Online Liquor’ आणि ‘Corona Helpline’ या दोन टर्मसंदर्भात गुगल ट्रेण्डवरील मागील एका आठवड्यातील भारतातील आकडेवारी पाहिली तर ऑनलाइन दारू मिळण्यासंदर्भात सर्च करणाऱ्यांचे प्रमाण ५ मे पासून सतत वाढलेलेच दिसत आहे. ७ मे ला हे प्रमाण अगदी १०० टक्यांनी वाढल्याचे चित्र गुगल ट्रेण्डच्या ग्राफमध्ये दिसत आहे. आजही (९ मे) ऑनलाइन दारुसंदर्भातील सर्च वाढत असल्याचे ग्राफमध्ये दिसून येत आहे.

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवारपासून देशभरात सुरूवात झाली आहे. मात्र पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात वेगवेगळ्या सेवांबद्दलचे नियम शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून अनेक राज्यांनाही काही प्रमाणात नियम शिथिल केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच अनेक राज्यांनी महसूल मिळणाऱ्या दारुच्या दुकानांना परवानगी दिली आहे. सोमवार आणि मंगळवारी देशातील अनेक शहरांमध्ये दारुच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.  लॉकडाउनच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पाळण्यात येणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही भंग झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले. काही ठिकाणी तर अगदी एक किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्याचे चित्रही पहायला मिळाले. मात्र दारुची दुकाने सुरु करण्यात आलेल्या गोंधळामुळे काही राज्यांनी थेट घरपोच दारु पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही फूड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्यांनाही यासंदर्भातील परवानगी मागितली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन दारु सर्च करणाऱ्या भारतीयांचे प्रमाणही प्रचंड वाढल्याचे गुगल ट्रेण्ड्समध्ये दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गुगलवर कोरना हेल्पलाइन संदर्भातील सर्चपेक्षा ऑनलाइन दारुसंबंधित सर्च करणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून येत आहे.

सर्च का वाढला?

दारुची दुकाने उघडण्यात आल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करुन अनेकजण दारुच्या रांगेत उभे असल्याचे चित्र पहायला मिळाले. करोनासारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय मागे घेतला. मात्र त्याऐवजी ऑनलाइनच्या माध्यमातून थेट घरपोच दारु पुरवठा करण्याचा निर्णय काही राज्यांनी घेतला. यामध्ये पंजाब, बंगाल, हरियाणासारख्या राज्यांचा समावेश आहे.

न्यायलयाचा निर्णय

लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ देताना केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार अनेक राज्यांनी दारुविक्रीला परवानगी दिली. मात्र, दारुविक्रीच्या आदेशात स्पष्टता नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी (८ मे रोजी) न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं कोणताही आदेश देण्यास नकार देत याचिका निकाली काढली. “सर्व राज्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचं पालन होण्यासाठी कोणताही संपर्क न होता दारू विक्री करण्याचा अर्थात होम डिलिव्हरीचा विचार करावा,” असे सूचना न्यायलयाने केली आहे. त्यामुळेच ऑनलाइन दारु उपलब्ध होण्यासंदर्भातील सर्च वाढल्याचे दिसत आहे.


दाक्षिणात्य आणि पूर्वेकडील राज्यांमधून दारुसंदर्भातील सर्च अधिक

दक्षिणेतील राज्यांमध्ये दारु खरेदीसाठी मद्यप्रेमींनी लावलेल्या रांगा आणि एकंदरीत सोशल डिस्टन्सिंगचा मद्यविक्री करताना उडालेला फज्जा सर्वांनी व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. मात्र रांगा लावून मद्य खरेदी करण्याबरोबर ऑनलाइन सर्च करण्यामध्येही केरळ वगळता सर्वच दाक्षिणात्य आणि पूर्वेकडील राज्यच आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. केरळमध्येही दारु संदर्भात सर्च करण्यात आले असले तरी इतर राज्यांच्या तुलनेत ते प्रमाण कमी आहे.

उत्तरेमधील ती दोन राज्ये

उत्तर भारतामधील दोनच राज्यांमध्ये करोना हेल्पलाइनपेक्षा मद्यविक्रीसंदर्भात अधिक सर्च झाल्याचे दिसून आलं आहे. ही दोन राज्य म्हणजे दिल्ली आणि पंजाब. या दोन्ही राज्यांमध्ये सोमवारी दारुच्या दुकानांसमोर मोठ्या रांगा दिसल्या होत्या. त्याचप्रमाणे या राज्यांमध्ये ऑनलाइन दारु मिळते का यासंदर्भातील सर्चचेही प्रमाण इतर शेजरी राज्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे. दिल्लीकरांनी ऑनलाइन लिकर टोकन संदर्भातही मोठ्याप्रमाणत सर्च केल्याचे गुगल ड्रेण्डमध्ये दिसून येत आहे.


एकंदरितच हे ट्रेण्ड पाहता ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन दारु विक्रीसंदर्भातही भारतीय खूपच आतुरतेने सर्चिंग करत असल्याचे दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 3:08 pm

Web Title: coronavirus online liquor beats corona helpline in google trend india data scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भारतात ‘स्वस्त’ iPhone ची विक्री कधीपासून? रजिस्ट्रेशनला झाली सुरूवात
2 Airtel चे तीन स्वस्त प्लॅन लॉन्च, 1GB डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे
3 48MP कॅमेऱ्यासह 5000mAh ची दमदार बॅटरी, Oppo A92 झाला लॉन्च
Just Now!
X