देशामध्ये करोनाचा प्रादूर्भाव दिवसोंदिवस वाढत असल्याने सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेकजण घरीच आहेत. काहीजण घरुनच काम करत आहेत. तर काहींना घरुन काम करण्याची सोय नसल्याने ते वेगवेगळे छंद जोपासून, इंटरनेटच्या मदतीने वेळ घालवत आहेत. मात्र या सर्वांमध्ये विवाहबाह्य संबंधांसाठी लोकप्रिय असणाऱ्या ग्लीडेन या डेटिंग अ‍ॅप कंपनीने एक अहवाल जारी केला आहे. लोकं घरी रहायला लागल्यापासून आपल्या कंपनीचं डेटिंग अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्या भारतीयांची संख्या ७० टक्क्यांनी वाढल्याचा दावा कंपनीने केला आहे. सोमवारी जारी केलेल्या अहवालामध्ये ग्लीडेन करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून आमच्या वेबसाईटवर लोक जास्त वेळ घालवत असल्याचा दावा केला आहे. ३१ मार्चपर्यंत भारतातील अनेक भागांमध्ये लॉकडाउन असल्याने आमच्या वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.

ग्लीडेनने आपल्या अहवालामध्ये आमच्या साईटवर गप्पा मारण्याचे प्रमाण वाढले असल्याचा दावा केला आहे. तसेच खासगी आणि पब्लिक या दोन्ही प्रकारांमध्ये फोटो अपलोड करण्याचेही प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले असल्याचं ग्लीडेननं म्हटलं आहे. २०१७ पासून भारतामध्ये ग्लीडेन सेवा पुरवत असून आठ लाख भारतीय आपल्या सेवेचा लाभ घेत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

इटलीसारख्या देशामध्ये ४ मार्चपासून सरकारने निर्बंध लागू केल्याने लोकांना घरात थांबवा लागत आहे. इटलीमध्येही ग्लीडेनचा वापर वाढल्याचा दावा कंपनीने केला आहे. आमच्या वेबसाईटवर येणाऱ्या यझर्सची संख्या ३०० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच इटलीमधील युझर्स सामान्यपणे सरासरी दोन तास आमच्या वेबसाईटवर असायचे आता हा वेळ तीन तासांपर्यंत गेला आहे असंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. “आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून लोक नवीन लोकांना भेट आहेत. ज्यांच्याबरोबर याआधी कधीही संवाद साधला नाही अशा लोकांशी आमच्या माध्यमातून संवाद साधला जात आहे. फ्रान्स आणि स्पेनमध्ये मागील काही दिवसांपासून लॉकडाउनला सुरुवात झाली असून तेथेही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे,” असा दावा कंपनीने केला आहे.