News Flash

Coronavirus Outbreak : आशियातील मृतसंख्या युरोपने ओलांडली

युरोपात एकूण ७८,७६६ जणांना संसर्ग झालेला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आशियातील मृतसंख्या युरोपने ओलांडली

पॅरिस : जगभरात करोना मृतांची संख्या आता ८०९२ झाली असून त्यात युरोपात ३४२२ तर आशियात ३३८४ जण मरण पावले आहेत. जगात एकूण दोन लाख सहाशे ऐंशी लोकांना संसर्ग झाला आहे. आशियातील मृतांच्या संख्येपेक्षा युरोपातील मृतांची संख्या अल्पावधीतच जास्त झाली आहे. २४ तासांत ६८४ जणांचा मृत्यू झाल्याने युरोपातील संख्या वाढली. युरोपात एकूण ७८,७६६ जणांना संसर्ग झालेला आहे.

स्पेनमध्ये मृतांची संख्या सहाशे झाली असून संसर्ग झालेल्यांची संख्या १३,७०० झाली आहे.  २४ तासांत १०७ जणांचे मृत्यू होऊन एकूण आकडा ५९८ झाला. माद्रिद शहर बंद असून तेथे ५,६३७ जणांना लागण झाली आहे. तेथे तपासणी संचांची कमतरता आहे.

इटलीत एका दिवसात ४७५ बळी

रोम :  इटलीमध्ये बुधवारी करोनाने एका दिवसात सर्वाधिक ४७५ बळी घेतले. करोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आतापर्यंत एका दिवसात इतक्या मोठय़ा प्रमाणात बळी गेल्याची ही जगातील पहिली घटना आहे.

करोना आर्थिक योजना

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनाक यांनी करोनामुळे डबघाईस आलेल्या उद्योगांसाठी ३३० अब्ज पाउंडांची मदत योजना जाहीर केली आहे. कर आणि तारण कर्जात बरीच सूट देण्यात आली आहे. लोकांची रोजीरोटी अबाधित राखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

ऑस्ट्रेलियात जैवसुरक्षा आणीबाणी लागू

मेलबर्न : देशातील लोकांनी अनावश्यक एकत्र येऊ नये, शिवाय परदेश प्रवास टाळावेत, असे आवाहन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान  स्कॉट मॉरिसन यांनी केले आहे. देशात शंभरपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात आत्तापर्यंत  ४५० जणांना  विषाणूचा संसर्ग झाला असून तेथे मानवी जैवसुरक्षा अणीबाणी लागू करण्यात आली आहे.

पंतप्रधान मॉरिसन यांनी बुधवारी सांगितले की, करोनाची साथ वाढत असून  लोकांनी  परदेशात जाणे टाळावे. दरम्यान, मंगळवारी ऑस्ट्रेलियात चाळीस नवीन रुग्ण सापडले आहेत. एकूण ४५४ निश्चित रुग्ण असून त्यातील ४३ बरे झाले तर पाच जणांचा मृत्यू झाला. मॉरिसन यांनी मानवी जैवसुरक्षा अणीबाणी जाहीर केली असून बाहेरच्या कार्यक्रमांना पाचशेपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमू नय तर घरातील कार्यक्रमासाठी शंभरपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमू नये, असा दंडक घालून दिला आहे. पहिल्या महायुद्धानंतर अशा प्रकारची परिस्थिती प्रथमच निर्माण झाली आहे, शंभर वर्षांतील हा वेगळाच प्रसंग आहे.

जगाप्रमाणे ऑस्ट्रेलियातही जीवन बदलत असून ते यापुढेही बदलत राहील, साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी  लोकांनी परदेशात जाण्याचे टाळावे, असे मॉरिसन यांनी म्हटले आहे.

रेस्टॉरंट, पब, स्पोर्ट्स क्लब याठिकाणी जमणाऱ्या लोकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली असून काही व्यापार व  उद्योग तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. देशातील शाळा मात्र अजून सुरू आहेत. ऑस्ट्रेलियान किमान सहा महिने तरी करोनाशी लढण्याची तयारी ठेवावी, अस आवाहन त्यांनी केले आहे. करोना विषाणूवर तातडीचा कुठलाच उपाय नाही,  त्यामुळे हजारो रोजगार जाऊ शकतात.

लोकांनी भीतीच्या भावनेतून वस्तूंची खरेदी करून साठेबाजी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी न्यू साउथ वेल्स येथे रुग्णांची संख्या ५९ ने वाढली असून हे लोक परदेशातून आलेले आहेत. तेथे २१०  रुग्ण होते, त्यांची संख्या आता २६९ झाली आहे.

क्वीन्सलँडमध्ये ९४ रुग्ण आहेत. क्वीन्सलँडच्या मुख्यमंत्री अ‍ॅनास्टाशिया पलासझुक यांनी सांगितले की, गेल्या आठवडय़ापेक्षा परिस्थिती खूप बदलली आहे. व्हिक्टोरियाचे मुख्यमंत्री डॅनियल अँड्रय़ू यांनी म्हटले आहे की, शंभरपेक्षा कमी लोकांनाही एकत्र येण्यावर बंदी घातली जाऊ शकते. परदेशातून लोक प्रवास करून आल्याने रुग्णांची संख्या वाढली असल्याचे मत आरोग्य अधिकारी ब्रेट सुटन यांनी व्यक्त केले आहे.

इराणमध्ये करोनाचे दिवसात १४७ बळी

तेहरान : करोनामुळे इराणमध्ये आणखी १४७ बळी गेले असून आतापर्यंत मृतांची संख्या ११३५ झाली आहे. एकाच दिवसात १४७ बळी गेले असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आरोग्य उपमंत्री अलिरेझा रैझी यांनी सांगितले की, आता करोनाबाबत सगळ्यांना माहिती झाली आहे पण काही लोकांनी ही परिस्थिती गांभीर्याने घेतलेली नाही. जर लोकांनी सहकार्य केले तरच ही साथ आटोक्यात येऊ शकते. जर सहकार्य नाही केले तर आणखी दोन महिने असेच चालू राहील. आतापर्यंत ११९२ नवीन रुग्णांना संसर्ग झाला असून एकूण रुग्णांची संख्या १७१६१ झाली आहे. तेहरान प्रांतात सर्वाधिक २१३ नवीन रुग्ण सापडले असून इसफाहन प्रांतात १६२ तर पूर्व अझरैजान प्रांतात ८४ नवीन रुग्ण आहेत. तेहरानमध्ये सर्व बाजार चालू असून लोक त्यांच्या मोटारीतून प्रवास करीत आहेत. दोन आठवडे लोकांनी घरात रहावे तरच आपण विषाणूचा मुकाबला करू शकू असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

इराणमध्ये नववर्षांची सुटी २० मार्चपासून सुरू होत आहे व ती एप्रिलपर्यंत चालणार आहे. अनेक इराणी लोक यावेळी पर्यटनस्थळी जाणार आहेत. इराणमध्ये अजून देश बंद करण्यात आलेला नाही. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चीनमध्ये ११ बळी; वुहानमध्ये एक रुग्ण ; मंगळवारी ११ बळी

बीजिंग :चीनमध्ये हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहान शहरात एकच निश्चित रुग्ण सापडला असून मंगळवारी चीनमध्ये ११ बळी गेले आहेत. लागोपाठ दुसऱ्या दिवशी वुहानमध्ये केवळ एक रुग्ण सापडला आहे. वुहानमध्ये हजारो वैद्यकीय कर्मचारी दाखल करण्यात आले होते ते आता माघारी जात आहेत. चीनच्या आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ११ बळी गेले असून १३ निश्चित रुग्ण सापडले आहेत. देशात निश्चित रुग्णांची संख्या ८०८९४ झाली असून ३२३७ जणांचा बळी गेला आहे. ६९६०१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहानमध्ये मंगळवारी ११ बळी गेले आहेत.

हुबेईत वुहान सोडून इतर १६ शहरांत  गेले १३ दिवस एकही नवीन निश्चित रुग्ण सापडलेला नाही. चीनने देशातील ४२ हजार आरोग्य कर्मचारी हुबेई व वुहानमध्ये तैनात केले होते. चीनने वुहान व हुबेईतील १४ तात्पुरती रुग्णालये बंद केली आहेत. २३ जानेवारीपासून करोना संसर्गामुळे  हुबेई प्रांत वुहान शहरासह बंद ठेवण्यात आला होता. तेथील उद्योगधंदे आता पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

ब्रिटनमध्ये ७१ बळी; उद्योगांसाठी मदत जाहीर

लंडन : ब्रिटनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या ७१ झाली. संसर्गित रुग्णांची संख्या २००० असून देशात सरकारपुढे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. लंडन हे या विषाणू संसर्गाचे केंद्र ठरले असून वेगवेगळ्या भागात आता हा विषाणू पसरत चालला आहे.

ब्रिटन निम्मे बंद झाले असून सरकारने सर्वाना घरात राहण्यास सांगितले आहे. देशांतर्गत व देशाबाहेर अनावश्यक  प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले. जॉन्सन यांनी सांगितले की, भारताने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना बंदी केली आहे. भारतीय लोक ब्रिटनमध्ये अडकून पडले असून त्यांच्यासाठी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. भारताने सोमवारी युरोप, तुर्कस्तान, ब्रिटन या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर १८ मार्च ते ३१ मार्च या काळात बंदी घातली आहे.

जॉन्सन यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच कडक निर्बंध लागू करण्यात आले असून त्याचा परिणाम रोगाचा प्रसार रोखण्यावर होईल. ब्रिटनमध्ये निम्मे बळी लंडनमध्ये गेले असून १९५० जणांना संसर्ग झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 3:03 am

Web Title: coronavirus outbreak 8092 deaths recorded across the world
Next Stories
1 Coronavirus Outbreak : देशात करोनाचे १७ रुग्ण वाढले
2 राज्यसभा निवडणुकीत गुजरात, राजस्थानमध्ये रंगत
3 करोना व्हायरसवर ‘हे’ जपानी औषध ठरतेय प्रभावी, चीनचा दावा
Just Now!
X