बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या बुधवारी दोन हजारांचा आकडा ओलांडून गेली आहे. मंगळवारी एकूण १३६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण निश्चित रुग्णांची संख्या ही ७४,१८५ झाली आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, सीओव्हीआयडी १९ या विषाणूने २००४ जण मरण पावले आहेत. मंगळवारी १७४९ जणांना नव्याने लागण झाली आहे. एकूण १३६ जण मंगळवारी मरण पावले असून त्यात हुबेई प्रांतात १३२ तर हेलाँगजियांग, शांगडाँग, ग्वांगडाँग, ग्विझू  येथे प्रत्येकी एक बळी गेला आहे.

नवीन ११८५ संशयित रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी २३६ जण गंभीर आजारी पडले असून १८२४ जणांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. आयोगाने म्हटले आहे की, ११९७७  रुग्ण गंभीर अवस्थेत असून ५२४८ जणांना विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे.

हाँगकाँगमध्ये मंगळवारी ६२ निश्चित रुग्ण सापडले असून मकावमध्ये १० तर तैवानमध्ये २२ रुग्ण आहेत. हाँगकाँग व तैवानमध्ये प्रत्येकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. चायना डेलीने म्हटले आहे की, बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही निश्चित रुग्णांपेक्षा प्रथमच जास्त झाली आहे.

१४३७६ जणांना लागण झाली होती ते बरे झाले असून त्यांना सोडून देण्यात आले आहे. मंगळवारी हुबेईतील वुचान वुचांग रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. लिऊ झिमिंग यांचा करोना विषाणूच्या संसर्गाने न्यूमोनिया होऊन मृत्यू झाला होता.

लिऊ हे मेंदूरोगतज्ज्ञ होते. गेल्या शुक्रवारी एकूण १७१६ रुग्णालय कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत सहा कर्मचारी या संसर्गाने मरण पावले आहेत. या विषाणूबाबत धोक्याची सूचना देणारे डॉ. ली वेनलियांग यांचा विषाणू संसर्गाने मृत्यू झाला.