CoronaVirus Outbreak : करोना तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. या कसोटीच्या काळात गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत करण्याचा निर्णय BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतला आहे.

‘हम तुम एक कमरे में बंद हो’… पाहा हार्दिक-नताशाचा ‘लॉकडाउन’ स्पेशल फोटो

२१ दिवसांच्या लॉकडाऊनने अनेक लोक बाधित आहेत. अशा लोकांच्या समर्थनार्थ गांगुली पुढे आला आहे. त्यामुळेच ५० लाख रुपयांचे तांदूळ दान देण्याचे वचन गांगुलीने दिले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवेदनात जाहीर करण्यात आल्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी शाळांमध्ये ठेवलेल्या गरजू लोकांना लाल बाबा कंपनीच्या साथीने ५० लाखांच्या तांदळाची मदत गांगुलीकडून करण्यात येणार आहे. आशा आहे की, गांगुलीच्या पुढाकाराने राज्यातील इतर नागरिकांनाही आपल्या राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी अशीच पावले उचलण्याची प्रेरणा मिळेल.

विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्यांसाठी सचिनचा खास संदेश, म्हणाला…

लाल बाबा कंपनीनेही पत्रक जारी केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की १.३ अब्ज लोकसंख्या असलेला भारत देश सध्या करोना व्हायरसच्या विळख्यात आहे. करोनाचा प्रसार कमी करण्याच्या प्रयत्नात २६ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये गेला आहे. त्यामुळे हा मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. तसेच या पत्रकात गांगुलीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुकही करण्यात आले आहे.