लांब पल्ल्याच्या वाहतुकीला हळूहळू सुरुवात; १५ राजधानी मार्गावर सेवा
नवी दिल्ली : करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर २५ मार्चपासून बंद करण्यात आलेली रेल्वेची प्रवासी वाहतूक मंगळवारपासून (१२ मे) टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने रविवारी जाहीर केला. सुरुवातीला नवी दिल्लीहून ये-जा करणाऱ्या १५ राजधानी मार्गावर या फेऱ्या पूर्ण क्षमतेनिशी धावणार असून त्यासाठीच्या आरक्षणाला सोमवारी सायंकाळी चार वाजल्यापासून सुरुवात होईल.
टाळेबंदीचा तिसरा टप्पा संपण्यास आठवडाभराचा कालावधी उरला असताना रेल्वेसेवा सुरू करण्याच्या या निर्णयाकडे टाळेबंदी अधिक शिथिल होण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलसह देशभरातील १५ राजधानी मार्गावर ३० फेऱ्या धावणार आहेत. या सर्व गाडय़ा पूर्णपणे वातानुकूलित राहणार असून संपूर्ण प्रवासी क्षमतेसह (एका डब्यात ७२ प्रवासी) या गाडय़ा धावतील. मात्र, या गाडय़ांच्या प्रवासभाडय़ात कोणतीही सवलत देण्यात येणार नाही, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या १५ रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुरळीत झाल्यानंतर आणखी काही नवीन मार्गावर रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येईल. रेल्वेने करोनाकक्षासाठी पुरवलेले २० हजार डबे आणि श्रमिकांची दररोज वाहतूक करणाऱ्या ३०० रेल्वेगाडय़ा यांना विचारात घेऊन उर्वरीत गाडय़ा सर्वसामान्य प्रवाशांसाठी चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
प्रवासाचे नियम
’या गाडय़ांसाठी केवळ ऑनलाइन तिकीट नोंदणी करता येईल. रेल्वे स्थानकांतील आरक्षण सुविधा व तिकीट खिडक्या बंदच राहतील.
’तिकिटांवर दिलेल्या सूचनांचे प्रवासादरम्यान पालन करणे बंधनकारक राहील.
’निश्चित (कन्फर्म) तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. प्रवाशांची स्थानकात प्राथमिक तपासणी करण्यात येईल.
’प्रवाशांना नाकातोंडावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. करोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाला परवानगी देण्यात येईल.
’प्रवाशांना ‘आरोग्यसेतू’ अॅप अनिवार्य असेल.
या मार्गावर वाहतूक :
नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल, दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, रांची, बिलासपूर, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळूरू, चेन्नई, थिरूवनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद, जम्मू तावी.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मजुरांचा प्रवासखर्च
परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना महाराष्ट्रात येण्यासाठी रेल्वे प्रवासाचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १७ मेपर्यंत सुटणाऱ्या रेल्वे गाडय़ांच्या प्रवासासाठी ही सुविधा लागू असणार आहे. त्यासाठी राज्य सरकार संबधित जिल्हाधिकाऱ्यांकडे ही रक्कम वर्ग करण्यात येईल, असे रविवारी जारी करण्यात आलेल्या शासननिर्णयात म्हटले आहे.
एसटीचा मोफत प्रवास रद्द
मुंबई: राज्यांर्तगत आणि परराज्यातून राज्यात येऊ इच्छिणाऱ्या व जाणाऱ्या मजूर, कामगार, विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी एसटीची मोफत प्रवाससुविधा देण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने रविवारी फिरवला. मोफत प्रवास के वळ राज्यात विविध ठिकाणी अडकलेले मजूर व नागरिकांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत घेऊन जाणे आणि महाराष्ट्रातील मजूर व अन्य रहिवासी जे इतर राज्यात अडकले आहेत त्यांना महाराष्ट्राची सीमा ते जिल्ह्य़ांर्तगत प्रवासासाठी असेल, असे स्पष्ट के ले आहे.
नोंदणी कुठे?
या गाडय़ांमधील आरक्षणासाठी नोंदणी ११ मे रोजी (सोमवारी) दुपारी ४ वाजता सुरू होणार असून, ते केवळ आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून करता येणार आहे.
चादरी, बेडशिट नाही
या रेल्वेगाडय़ा राजधानी दर्जाच्या असल्या तरी, प्रवाशांना चादरी आणि बेडशिट पुरवले जाणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच डब्यांतील वातानुकूलनाचे प्रमाण कमी असेल व ताज्या हवेचा पुरवठा जास्तीत जास्त होईल, याची दक्षता घेण्यात येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 4:37 am