सिंगापूर : सिंगापूरमध्ये आणखी ५२८ लोकांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे त्या देशाने गुरुवारी जाहीर केले. यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या १६ हजार १६९ वर पोहचली असून, त्यापैकी बहुतांश परदेशी नागरिक आहेत.

ताज्या प्रकरणांपैकी सहा जण सिंगापूरचे नागरिक आणि स्थायी रहिवासी (विदेशी) आहेत. बहुतांश करोनाबाधित वसतिगृहांमध्ये राहणारे परदेशी नागरिक आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

सिंगापूरने करोनाविरुद्धची लढाई पुढील स्तरावर नेली आहे. लोकसंख्येत कोविड-१९ चा संसर्ग किती प्रमाणावर झाला आहे आणि कच्चे दुवे कुठे आहेत हे ठरवण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे वृत्त ‘दि स्ट्रेट्स टाइम्स’ने गुरुवारी दिले.

ज्यांना संसर्ग झाला आहे, मात्र त्यांच्यात कुठलीही लक्षणे दिसून न आल्यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली नाही, असे किती लोक आहेत हे शोधण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जात आहे.

एखाद्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला आहे अथवा नाही हे ठरवण्यासाठी व्यक्तीच्या प्रतिदव्यांचे (अँटिबॉडीज) पृथक्करण करण्यासाठी रक्तरस चाचण्या (सेरॉलॉजी टेस्ट्स)म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाचण्यांचा वापर करून हे करण्यात येत असल्याचे हा उपक्रम राबवणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसिझेस (एनसीआयडी)ने म्हटले आहे.