पान मसाल्याची तलफ आल्यानं करोनाबाधित रुग्णाने थेट रुग्णालयातून पळ काढल्याचा प्रकार आग्रा येथे घडला आहे. रुग्णालयातून पळून गेल्यानंतर रुग्ण आधी पान टपरीवर आणि नंतर आपल्या एका मित्राच्या घरी पोहोचला. रुग्ण बेपत्ता झाल्याने रुग्णालयात मात्र एकच धावपळ सुरु झाली होती. जवळपास एक तास रुग्णाचा शोध घेतला जात होता. अखेर हा रुग्ण आपल्या मित्राच्या घरी सापडला. यामुळे आता त्याचा मित्र आणि अख्खं कुटुंब विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

विशेष म्हणजे रुग्णाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपण पान मसाल्याची तलफ आल्यानं पळ काढल्याची कबुली दिली. तसंच रुग्णालयाजवळ पानाची टपरी दिसली नाही यामुळे आपल्याला थोडा प्रवास करावा लागल्याचंही त्याने सांगितलं आहे. पान मसाला खाल्यानंतर या पठ्ठ्याने आपले खिसे पान मसाल्याने भरुन घेतले होते.

यानंतर त्याने आपल्या मित्राला भेटण्याचा विचार केला. रुग्ण ज्या मित्राच्या घरी गेला होता त्याच्या कुटुंबाला आपण करोना रुग्णाला घरात घेतलं आहे याची कल्पनाच नव्हती. रुग्णाच्या घरी फोन केल्यानंतर त्यांना याची माहिती मिळाली. इतकंच नाही त्याने कुटुंबाकडे आपल्याला खासगी रुग्णालयात दाखल करा अशी विनंतीही केली.

एस एन मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी या रुग्णाला सध्या विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. त्याची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.