जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच करोनाचा उपाचार घेणाऱ्या अमेरिकेतील एका रुग्णाच्या हाती तब्बल ११ लाख डॉलर्स म्हणजे जवळपास ८.१४ कोटी रूपयांची बिल देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करोनाच्या संसर्गामुळे रुग्णाची प्रकृती खालावली होती. तसंच त्यांच्या पत्नीनं आणि मुलांनीही त्यांची प्रकृती सुधारण्याची आशा सोडून दिली होती.

सिएटल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, फ्लोर यांना ईशाक येथील स्वीडिश मेडिकल सेंटरमध्ये देण्यात आलेल्या उपचारानंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. दरम्यान, यानंतर रुग्णालयां आपल्या हाती ११ लाख डॉलर्सचं बिल दिल्याची माहितीही त्यांनी दिली. फ्लोर यांना स्वीडिश मेडिकल सेंटरमध्ये तब्बल ६२ दिवस दाखल करण्यात आलं होतं. करोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. रुग्णालयात करोनाचा सर्वाधित दिवस उपचार घेणारे रुग्ण ते ठरले आहेत.

वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार फ्लोर यांच्या आरोग्यविमा आहे. तसंच त्या अंतर्गत बहुतांश रक्कम ही त्यांना द्यावी लागणार नाही. तर दुसरीकडे अमेरिकेच्या संसदेनं करोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी विशेष कायदाही लागू केला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही रकमेचा भरणा करावा लागणार नसल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, करोनाला मात्र देऊन प्रकृती उत्तम झाली असली तरी आपल्याला मोठं आश्चर्य वाटत असल्याचंही फ्लोर म्हणाले.

१८१ पानांचं बिल

फ्लोर यांना रुग्णालयानं तब्बल १८१ पानांचं बिल सोपवलं आहे. त्यामध्ये आयसीयूच्या बेडचे दर दिवसाचे शुल्क म्हणून ९ हजार ७३६ डॉलर्स, २९ दिवसांचा व्हेंटिलेटरचा खर्च ८२ हजार २१५ डॉलर्स आणि हृदय, यकृत आणि फुफ्फुसांच्या उपचारांसाठीच्या दोन दिवसांचा खर्च तब्बल १ लाख डॉलर्स यांचाही समावेश आहे.