करोना व्हायरसनं देशात तसंच राज्यात थैमान घातलं आहे. देशात, राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दरम्यान एका दिवसात महाराष्ट्रात तब्बल १ हजार २३३ नवे रुग्ण समोर आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर दिवसभरात ३४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या आता १६ हजार ७५६ वर पोहोचली आहे. राज्यात एका दिवसात १ हजार २३३ करोनाचे नवे रुग्ण सापडले असून ३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी राज्यातील ७०० करोनाग्रस्तांना उपचारानंतर बरं करून घरी सोडण्यात आल्याचं यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. तसंच बुधवारी २७५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात करोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचं ते म्हणाले होते.

उपचारानंतर सोमवारी ३५० जणांना तर मंगळवारी ३५४ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सलग दोन दिवसांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच सव्वा महिन्यात सुमारे २ हजार ८१९ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती.

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारणत: मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडणे सुरू झाले आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या दोन दिवसात राज्यात सर्वाधिक मुंबईतील ४६० रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यापाठोपाठ पुणे मंडळातील २१३ रुग्णांना बरं करून घरी पाठविण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

मृतांमध्ये २१ पुरूष १३ महिला

करोनामुळे एका दिवसात तब्बल ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २१ पुरूष आणि १३ महिला असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी १८ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे आहेत. तर १३ रुग्ण हे ४० ते ५९ आणि ३ रुग्ण ४० वर्षाखालील आहेत. त्यापैकी २७ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार असल्याची माहितीही समोर आली आहे.