देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. देशात करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सादर केलेल्या आकडेवारीनुसार १ मे रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत देशातील करोनाग्रस्तांची संख्या ३५ हजार ४३ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे देशभरात १ हजार १४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत ८ हजार ८८८ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या देशभरात २५ हजार ७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढून की १० हजार ४९८ वर पोहोचली आहे. तर गुजरातमध्ये करोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ३९५ आणि दिल्लीत ३ हजार ५१५ वर पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान केंद्रानं चाचण्यांसाठी केवळ RTP-CR टेस्टिंगचाच वापर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

दुपटीचा वेग मंदावला

लॉकडाउनपूर्वी देशात करोनाच्या दुपटीचा वेग हा ३.४१ होता तो आता वाढून ११ दिवस झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. तर केंद्र शासित प्रदेश आणि काही राज्यांमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पंजाब या ठिकाणी दुपटीचा वेग ११ ते २० दिवसांदरम्यान असल्याचं त्यांनी सांगितलं. तर आसाम, तेलंगण, छत्तीसगढ आणि हिमाचल प्रदेशमध्ये हा दर ४० दिवसांपेक्षाही अधिक असल्याचं सांगण्यात आलं.

जगभरात ३२ लाखांपेक्षा अधिक रुग्ण
करोनाचा प्रसार २०० पेक्षा अधिक देशांमध्ये झाला आहे. जगभरात करोनाग्रस्तांची संख्या ३२ लाख ३९ हजार २२० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २ लाख २८ हजार ८६० जणांचा मृत्यू झाला आहे. १० लाख १० हजार ६५९ जण या आजारातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे.