करोना प्रसार अजूनही थांबलेला नाही. दररोज हजारो नवीन रुग्ण आढळून येत आहे. तर दुसरीकडे करोनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणामही समोर येत आहेत. असाच एक प्रकार कर्नाटकात रुग्णाच्या शरीरात आढळून आला आहे. करोनामुळे मरण पावलेल्या या रुग्णाचं फुफ्फुस लेदर बॉलसारखं टणक झाल्याचं शवविच्छेदन करताना आढळून आलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नं या घटनेचं वृत्त दिलं आहे. करोना विषाणू माणसाच्या शरीरात जाऊन त्याच्या फुफ्फुसावर हल्ला करतात. यात अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. करोना विषाणुमुळे रुग्णाच्या फुफ्फुसाची किती भयंकर अवस्था होते, हे कर्नाटकातील रुग्णाच्या शवविच्छेदनानंतर दिसून आलं आहे.

६२ वर्षांच्या एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णाचा मृत्यू फुफ्फुसाची विचित्र अवस्था झाल्यानंच रुग्णाचा बळी गेल्याचं आढळून आलं. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर १८ तासांनंतरही त्याच्या नाक व घशात करोनाचे जिवंत विषाणू आढळून आले.

यातून रुग्णाच्या मृत्यूनंतरही मृतदेहाच्या संपर्कात आल्यास करोना होऊ शकतो, ही माहितीही समोर आली आहे. ऑक्सफर्ड वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर दिनेश राव यांनी सांगितलं की, “या रुग्णांचं फुफ्फुस करोनाच्या संक्रमणामुळे एखाद्या लेदर बॉलसारखे झाले होते. फुफ्फुसात हवा भरणारा भाग पूर्णपणे खराब झालेला होता. तर वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनल्या होत्या. मृतदेहाच्या तपासणीमुळे करोनाची नवी अवस्था समजून घेण्यास मदत मिळाली आहे,” असं राव म्हणाले.

राव यांनी मृतदेहाच्या नाक, घसा, तोंड, फुफ्फुसाचा पृष्ठभाग, चेहरा व गळ्याच्या त्वचा अशा पाच ठिकाणचे नमुने घेतले होते. आरटीपीसीआर चाचणीनंतर कळालं की घशात आणि नाकात करोना विषाणू आढळून आले. त्यातूनच ही माहिती समोर आली की, करोना रुग्णाच्या मृतदेहापासूनही दुसरे लोक संक्रमित होऊ शकतो.