करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपला मात्र त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यामुळे अनेकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीमधील चिल्ला गाव परिसरामध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने लोकांना तासन् तास पाण्याच्या टँकरसाठी रांगेत उभं रहावं लागत आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्येही शेकडो लोकं पाण्यासाठी रांगेत उभी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

चिल्ला गाव परिसरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडून अनेकजण अगदी एकमेकांच्या जवळजवळ रांगेत उभे असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील ‘दिल्ली जल बोर्डा’कडून पुरवण्यात येणारा टँकर गावामध्ये तीन चार दिवसातून एकदाच येतो. त्यामुळेच स्थानिकांना भर दुपारी रणरणत्या उन्हात पाण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत उभं रहावं लागतं असल्याचे, एएनआयने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकं करुनही पाणी न मिळाल्यास पाण्याच्या शोधामध्ये येथील स्थानिकांना दूरपर्यंत जावे लागते.

दिल्लीमधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतान दिसत आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये करोनाचे ६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीमधील करोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारीच एक हजार ७०० हून अधिक झाली होती. तर करोनामुळे मरण पावलेल्याची संख्या (शुक्रवारपर्यंत) ४२ इतकी होती. दिल्लीमधील करोनाचे संकट दिवसोंदिवस वाढत असतानाच केवळ पाण्यासाठी चिल्ला गाव येथील लोकांना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दिल्ली जल बोर्डाकडून नियमीत पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी स्थानिक करताना दिसत आहेत.