दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमात मर्कझच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यानंतर तबलिगी जमातच्या १६७ सदस्यांना नॉर्थर्न रेल्वेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. मात्र यावेळी त्यांच्याकडून डॉक्टर आणि तिथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केलं जात आहे. नॉर्थन रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

तबलिगी मर्कझने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या ५० जणांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. फक्त दिल्लीच नाही तर देशभरातील अनेक मुस्लीम या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला असून तबलिगी जमातच्या मर्कझमधून करोनाच्या विषाणूंचा अनेक राज्यांमध्ये फैलाव झाला असल्याची भीती आहे. यामुळे मर्कझमधील जवळपास १६७ सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मात्र तिथे त्यांच्याकडून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना चुकीची वागणूक दिली जात असल्याचं समोर आलं आहे.

दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तबलिगी जमात निझामुद्दीनच्या १६७ लोकांना पाच बसेसमधून तुघलकाबाद क्वारंटाइन सेंटरमध्ये आणण्यात आलं होतं. रात्री ९ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ते पोहोचले होते. यामधील ९७ जणांना डिझेल शेड ट्रेनिंग स्कूल क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं तर ७० जणांना आरपीएफच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये जागा देण्यात आली”.

“पण सकाळपासूनच हे लोक असभ्य वर्तन करत आहेत. जेवणाच्या अवास्तव मागण्या करत आहेत. यावेळी त्यांनी क्वारंटाइनमधील कर्मचाऱ्यांसोबत चुकीचं वर्तन केलं. इतकंच नाही तर ते सगळीकडे थुंकत होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावरही थुंकत होते. तसंच हॉस्टेल इमारतीच्या आजुबाजूला फिरत होते,” अशी धक्कादायक माहिती दीपक कुमार यांनी दिली आहे.

बुधवारी दिल्ली सरकारने निजामुद्दीन मर्कझमधून २३०० लोकांना बाहेर काढलं आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकऱणी अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणारे मौलाना साद यांचाही समावेश आहे. दरम्यान बुधवारी देशात करोनाबाधितांची संख्या १६३७ वर पोहोचली असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.