करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने केंद्र सरकार १८ जूनपासून पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. केंद्र सरकारने मात्र हा दावा फेटाळला असून चुकीचा असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. ही एक अफवा असून विश्वास ठेऊ नका असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. पीआयबीने हा मेसेज खोटा असल्याची माहिती देणारं ट्विट केलं आहे. असा कोणाताही प्रस्ताव विचाराधीन नसून अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहा असं त्यांनी स्प्ष्ट सांगितलं आहे.

काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील लॉकडाउन पुन्हा वाढवला जाणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा दावा फेटाळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील लॉकडाउन वाढवला नसून, उगाच दुकानांबाहेर गर्दी करु नका असं आवाहन केलं आहे.

दुसरीकडे तामिळनाडूने करोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या चार शहरांमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडानची कठोर अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी इतर शहरांना शिथीलता असणार आहे. यादरम्यान LocalCircles ने देशात एका महिन्यासाठी लॉकडाउन वाढवला जावा का ? यासंबधी एक सर्व्हे केला असता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने हा सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. यामधील अनेकांनी लॉकडाउन पुन्हा वाढवला जावा अशी मागणी केली आहे. तसंच करोनाचा फटका बसलेल्या शहरांमध्ये कठोर लॉकडाउन लागू करावा अशीही मागणी केली आहे.

देशातील २२१ जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. ४६ हजार लोक या सर्व्हेत सहभागी झाले होते. महत्त्वाचं म्हणजे ६० टक्क्यांहून जास्त लोकांनी मुंबई आणि चेन्नईत लॉकडाउन वाढवला जावा असं मत नोंदवलं आहे. सहभागी होणाऱ्यांनी किमान चार आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवला जावा या प्रश्नावर सहमती नोंदवली आहे. दरम्यान दिल्लीतील ७९ टक्के लोकांना लॉकडाउन वाढवला जावा असं म्हटलं आहे.

एकीकडे देशात लॉकडाउन शिथील करण्याच्या हालचाली सुरु असताना लोकांनी मात्र लॉकडाउन वाढवला जाण्याची मागणी केली आहे. अर्थचक्राला गती देण्यासाठी सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे आयसीएमआरने अद्यापही देशातील करोनाची परिस्थिती गंभीर होण्यापासून दूर असल्याचं म्हटलं आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतात करोनाचा प्रभावा वाढेल असं आयसीएमआरमधील संशोधकांच्या अभ्यासात समोर आलं आहे. करोनाबाधित देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.