जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण करणारा व हजारो जणांचा जीव घेणारा करोना व्हायरस हळूहळू सर्वत्र पसरत आहे. जगभरातील अनेक देश या वरील उपचार शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदी यांनी आपला बांगलादेश दौरा रद्द केला आहे.  १७ मार्च रोजी ते ढाका येथे शेख मुजीबुर रहमान यांच्या जयंती शताब्दी कार्यक्रमासाठी जाणार होते.

बांगलादेश सरकारनेही  करोनाचा धोका लक्षात घेता शेख मुजीबुर रहमान यांचा जयंती शताब्दी समारोह रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर पंतप्रधान मोदींनी करोनामुळे आपला ब्रुसेल्स दौरा रद्द केला होता.

केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून देशातील रुग्णांची संख्या आता ३९ झाली आहे. या कुटुंबातील तिघांनी अलीकडेच इटलीला भेट दिली होती. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी या रुग्णांविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, पण जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.

जगभरात या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असताना देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासंदर्भातील देशातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मोदींनी शनिवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. या बैठकीला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, आरोग्य राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे आणि इतर उच्चाधिकारी उपस्थित होते.