देशात दैनंदिन रुग्णसंख्येने जागतिक उच्चांक गाठला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी मोदींकडे राजधानीत ऑक्सिनजचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं सांगत मदत मागितली. तसंच अनेक पर्यायही सुचवले. मात्र नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात सुरु असलेल्या चर्चेचं टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण होत असल्याने वाद निर्माण झाला.

नेमकं काय झालं ?
करोनासंबंधी राष्ट्रीय योजना असेल तर केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारं त्यादृष्टीने काम करतील असं अरविंद केजरीवाल सांगत होते. अरविंद केजरीवाल आपलं म्हणणं मांडत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रोखलं आणि फटकारलं.

“ऑक्सिजन प्लांट भारतीय लष्कराच्या हाती द्या”, मुख्यमंत्री केजरीवाल यांची पंतप्रधानांना सूचना

मोदी म्हणाले की, “मुख्यमंत्री अशा अंतर्गत बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण करणं आपली परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. हे योग्य नाही. आपल्याला नेहमी याचं पालन केलं पाहिजे”. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी खेद व्यक्त करत पुढच्या वेळी हे लक्षात ठेवू असं सांगितलं. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपलं म्हणणं पूर्ण करत आपण काही चुकीचं केलं असेल तर माफ करावं सांगत माफी मागितली. यावेळी त्यांनी मोदींना आपण दिलेल्या निर्देशांचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं.

दिल्ली मुख्यमंत्री कार्लायलाचा खुलासा
मुख्यमंत्री कार्यालयाने यासंबंधी खुलासा केला असून केंद्र सरकारने चर्चेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती असं सांगितलं आहे.

या बैठकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूतील मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.

बैठकीत केजरीवाल काय म्हणाले –
अरविंद केजरीवाल यांनी ऑक्सिजन प्लांटचा ताबा लष्कराच्या हाती देण्याची सूचना केली. राज्यांना ऑक्सिजन लवकर मिळावा यासाठी भारतीय लष्कराची मदत घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तर मुख्यमंत्री असूनही काहीच करू शकत नसल्याची व्यथाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मांडली.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य!

“हवाई मार्गाने सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. ऑक्सिजन एक्स्प्रेसची सुविधा दिल्लीत सुरु झाली पाहिजे. त्याचबरोबर देशात लस एकाच किंमतीत देणं आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यांना वेगवेगळ्या किंमती का?”, असा प्रश्नही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत उपस्थित केला.

दिल्लीत ऑक्सिनजचा तुटवडा असल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते अशी भीती अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. ऑक्सिजन टँकर्सना शहरात प्रवेश कऱण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीमध्ये ऑक्सिजन टँकर्सची सुरळीत वाहतूक व्हावी यासाठी मी हात जोडून विनंती करतो असंही ते मोदींना म्हणाले.

“ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट नसेल तर दिल्लीच्या लोकांना ऑक्सिजन मिळणार नाही का? दिल्लीसाठी येणारा ऑक्सिजन टँकर दुसऱ्या राज्यात रोखल्यानंतर मी केंद्रात कोणाशी बोलावं आपण सुचवावं,” असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.