देशामध्ये दिवसोंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक ऐतिहासिक घोषणा करत संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाउन राहिल अशी घोषणा केली आहे.  “जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधन नाहीत, असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. यावेळेस त्यांनी सोशल मिडियावर अनेक अफवा पसरतात त्यापासून सावध राहा असाही इशारा देशातील नागरिकांना दिला. मात्र त्याचवेळी त्यांनी सोशल मिडियावरील करोनाचा वेगळा अर्थही आपल्या भाषणामध्ये सांगितला.

“करोनाबद्दल अनेक गोष्टी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पहायला मिळत आहेत. मात्र त्यापैकी मला एक मेसेज खूपच आवडला. तो होता कोरोनाचा अर्थ काय आहे हा. मी तुम्हाला दाखवतो तो मेसेज काय होता,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी एक कागद हातात धरुन ‘कोरोना’चा अर्थ सांगितला. मोदींनी हातात धरलेल्या पोस्टरमध्ये तोंडावर मास्क लावलेल्या एका मुलीचे चित्र होते आणि बाजूला ‘कोरोना’ या शब्दाची फोड करण्यात आली होती. ‘करोना’ शब्दातील प्रत्येक अक्षरातून एक अर्थ निघतो असं सांगणारा हा मेसेज होता. यामध्ये ‘को’ म्हणजे ‘कोई’, रो म्हणजे ‘रोड पर’ आणि ‘ना’ म्हणजे ‘ना निकले,’ असा अर्थ होत असल्याचे या पोस्टरमध्ये सांगण्यात आलं होतं.

नक्की वाचा >> लॉकडाउन २१ दिवसच का? मोदींनीच सांगितलं कारण

या व्हायरल मेसेजच्या माध्यमातून मोदींनी पुढील २१ दिवस कोणीही रस्त्यावर बाहेर पडू नका असाच संदेश देशवासियांना दिला आहे. आपल्या भाषणामध्ये मोदींनी करोनाचे संक्रमण कसे होते हे सांगितले. “जगभरातील अनेक देशामध्ये कोरनाचा प्रसार झाला आहे. याच पार्श्वभूमीवर तेथील मागील दोन महिन्याच्या परिस्थितीचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की करोनाचा संक्रमण होण्याची सायकल मोडण्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच पुढील २१ दिवस भारतामध्ये संपूर्ण लॉकडाउन असेल,” असं मोदींनी सांगितलं. “याचा आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असला तरी प्रत्येक भारतीयाचा जीव वाचवणे हीच भारत सरकारची प्रथमिकता आहे,” असंही मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं.