पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिन्यात करोना तसंच इतर मुद्द्यांवर ५० हून अधिक बैठका घेतल्या आहेत. नरेंद्र मोदींनी या काळात विकासकामांच्या ब्ल्यू प्रिंटपासून ते अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी चर्चा केली. नरेंद्र मोदींनी यावेळी करोनाचा सामना कऱण्यासाठी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकांमध्ये अनेक क्षेत्रांना दिलासा देण्यावरही चर्चा झाली. आगामी काळात यासंबधी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

नियमित बैठका तसंच सार्वजनिक कार्यक्रम नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसभवर व्हर्च्यूअल बैठकांमध्ये व्यस्त असायचे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठका टाळल्या जाऊ शकत नव्हत्या. एका बैठकीत जवळपास १० लोक सहभागी असायचे आणि एक व्यक्ती दोन तास बैठकीत असायची. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा होत होत्या. विकासाला गती कशी देता येईल यावरही मंथन होत होतं.

पायाभूत सुविधा, आरोग्य तसंच इतर क्षेत्रांसंबंधीही या बैठकांमध्ये चर्चा झाली असून येथे तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर मत मांडण्यात आलं. याशिवाय मध्यम वर्गीय आणि गरीबांसाठी कल्याणकारी योजना तसंच त्यांचं आयुष्य अजून सुखकर करण्यासंबंधी काय उपाययोजना करता येतील यावरही चर्चा करण्यात आली.

बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “नरेंद्र मोदींनी बैठकीत बंदरांच्या जमिनींचा प्रभावी वापर, करवसुलीमधील पारदर्शकता यांच्यात तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं मत मांडलं”. पंतप्रधानांनी राज्यांनाही क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला दिला. याशिवाय ग्रामीण भागात ऑनलाइन लर्निंगवरही त्यांनी जोर दिला.

पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत नीति आयोगानेही सादरीकरण केलं. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी सुचवलेल्या सुधारणांचा आर्थिक सल्लागार समिती आणि वित्त मंत्रालयानेही विचार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या आर्थिक पॅकेजच्या जागी, अनेक क्षेत्रांसाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. बैठकांमध्ये रिअल इस्टेटचाही समावेश होता. आगामी काळात रिअल इस्टेटमधील मागणीकडे लक्ष असणार आहे. पंतप्रधानांच्या बैठकीत तंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असायचा.