करोना संकट अद्यापही टळलेलं नसून काही राज्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. करोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. २३ सप्टेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. गेल्या काही आठवड्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असून या राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक होत असल्यानेच नरेंद्र मोदी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या सात राज्यांमध्ये देशात सर्वाधिक फटका बसलेल्या दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. शनिवारी देशात ९३ हजार ३३७ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. २४ तासांत एकूण ९५ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून डिस्चार्ज देण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशाचा रिकव्हरी रेट सध्या ७९.२८ इतका झाला आहे.

जगभरात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील ६० टक्के अॅक्टिव्ह केसेस महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या १० राज्यांनी करोनवार मात केली तर भारताचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.