केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या एका वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. जोधपूर येथील एका रुग्णालया दिलेल्या भेटीदरम्यान शेखावत यांनी एका करोना रुग्णाच्या नातेवाईकांना, “बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल,” असा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. यावरुनच आता नवीन वाद निर्माण झाला असून शेखावत यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

केंद्रातील सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या शेखावत यांनी राजस्थानमधील काही रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी दौरे केले. यादरम्यान जोधपूरमधील परिस्थिती चिंताजनक असल्याने येथील रुग्णालयांबरोबरच त्यांनी राज्यातील आयआयएम्स, एमडीएम आणि एमजीडी रुग्णालयांना भेट दिली. या भेटींदरम्यान मथुरदास माथुर रुग्णालयामध्ये पहाणी करत असताना एकाजण शेखावत यांच्या जवळ आला आणि त्याने डॉक्टरांना पाठव्यासंदर्भात तुम्ही जरा रुग्णालयात सांगा ना. डॉक्टर वेळेत आले तर माझ्या आईचे प्राण वाचतील, अशी विनंती केली. त्यानंतर शेखावत यांनी त्यांच्या बाजूला उभ्या असणाऱ्या अधिकाऱ्याला कोणाला तरी या व्यक्तीच्या आईकडे लक्ष देण्यास सांगा, असं सांगितलं. मात्र या महिलेची तपासणी करण्यासाठी डॉक्टर पोहचेपर्यंत तिचा मृत्यू झाला.

आणखी वाचा- हृदयद्रावक! बेड नसल्याने तीन रुग्णालयांनी दिला नकार, रिक्षामध्ये पत्नी तोंडाने ऑक्सिजन देत राहिली पण…

यानंतर याच रुग्णालयामध्ये शेखावत यांनी काही रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यापैकी दोन महिला प्रचंड रडत होत्या. त्यांनी यापुढे आमचं कसं होणार असा प्रश्न शेखावत यांना विचारला. त्यावर शेखावत यांनी देवावर विश्वास ठेवा तो सर्वकाही ठिक करेल, असं सांगितलं. “बालाजी महाजारांचं नामस्मरण करा, त्यांना नारळ वाहा सर्व काही ठीक होईल,” असं शेखावत यांनी या मदत मागणाऱ्या महिलांना सांगितलं आणि ते पुढे गेले.

आणखी वाचा- Video : लग्नाच्या एक दिवसआधीच नवरा Covid Positive आल्याने PPE कीट घालून घेतले साप्तपदी

यासंदर्भात टीका झाल्यानंतर शेखावत यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. “डॉक्टर त्याचं काम करत आहेत. बालाजीवर श्रद्धा ठेवा आणि नारळ वाहा,” असा सल्ला देण्यात काय चुकीचं आहे, असा प्रश्न शेखावत यांनी विचारला आहे. या ट्विटमधून त्यांनी आपण केलेलं वक्तव्य योग्यच असून रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना मानसिक आधार देणे हे चुकीचं आहे का?, असं विचारलं आहे.

“घाबरलेल्या रुग्णाच्या आईच्या मनाला शांती मिळावी म्हणून तिला आधार देणं. तसेच औषधांबरोबर प्रार्थनाही कामी येतील हे सांगणं हेच मी केलं. डॉक्टरांकडून मिळणाऱ्या उपचारांसंदर्भात मला काहीही शंका नसून ते त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत,” असंही शेखावत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.