सध्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलेला असून विविध स्तरांवर सावधगिरी बाळगण्यात येत आहे, याला ब्रिटिश राजघराणंही अपवाद नाही. इंग्लंडमध्येही करोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये वाढ झाली असून, लोकांच्या भेटीगाठी घेताना हात मिळवू नका असा सल्ला देण्यात येत आहे. या सल्ल्याचे पालन ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्तिही करत आहेत. अन्य लोकांशी कुठल्याही प्रकारचा शारीरिक संबंध येऊ देऊ नका, हा सल्ला रॉयल फॅमिलीचे सदस्य तंतोतंत पाळत आहेत. प्रिन्स चार्ल्स यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये लोकांशी हस्तांदोलन करणं टाळलं व चक्क भारतीय पद्धतीच्या नमस्तेचा अवलंब केला.